विभागीय आयुक्तांनी घेतली आधिकाऱ्यांची ‘शाळा’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची औरंगाबाद येथे  महापालिकेतील अधिकारी यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी, गटनेते, विरोधी पक्षनेते, काही सभापतींनी भेट घेऊन नळजोडणी दराबाबत सखोल चर्चा केली. यामध्ये प्रशासनासह शहर अभियंता विभागाचे अभियंते यांचीदेखील उपस्थिती होती. शहर अभियंता विभागाला चांगलेच धारेवर धरले. तसेच सज्जड इशाराही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

परभणी : परभणी महापालिकेच्या नळजोडणी दराबाबत शहर अभियंता विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिलेल्या दराची ढाल पुढे करून नळजोडणीचे दर निश्चित करीत असल्याबद्दल विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी (ता.१६) शहर अभियंता विभागाला चांगलेच धारेवर धरले. तसेच सज्जड इशाराही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
परभणी महापालिकेने निश्चित केलेल्या नळजोडणी दरावरून नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. या प्रकरणी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हस्तक्षेप करून जोडणीची प्रक्रिया महापालिकेने राबवावी, अशा आयुक्त रमेश पवार यांना सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रमुख नेते, पदाधिकारी, गटनेते, विरोधी पक्षनेते, काही सभापती यांच्यात शनिवारी (ता.१५) महापालिकेत बंद दाराआड चर्चा झाली होती व तिथे रविवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन दराबाबत चर्चा करण्याचे निश्चित झाले होते. रविवारी सकाळीच ही मंडळी औरंगाबादकडे रवाना झाली होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची या मंडळींनी भेट घेऊन नळजोडणी दराबाबत सखोल चर्चा केली. यामध्ये प्रशासनासह शहर अभियंता विभागाचे अभियंते यांचीदेखील उपस्थिती असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - पेरुने दिला ‘या’ शेतकऱ्याला बक्कळ पैसा !

अभियंता विभाग पुन्हा एकदा रडारवर
महापालिका ही सक्षम असून तेथे हे कुशल अधिकारीवर्ग आहेत असे असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून दर घेण्याची काय आवश्यकता होती?, असा सवाल श्री केंद्रेकर यांनी उपस्थित केला. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणी आयुक्तांनी का लक्ष दिले नाही?, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केल्याची माहिती आहे. सर्वसामान्यांना परवडतील असेच जर निश्चित करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीत पालिकेचा शहर अभियंता विभाग पुन्हा एकदा रडारवर आल्याचे चित्र आहे.

साहित्य खरेदीचे अधिकार नागरिकांनाच?
महापालिकेने अनामत रक्कम घ्यावी व वॉटर मीटरसह सर्व साहित्य खरेदी करण्याचे अधिकार नागरिकांनाच द्यावेत. कुशल प्लंबर निवडून त्यांना प्रशिक्षण द्यावे ओळखपत्र द्यावे व अनाधिकृत नळ जोडणी धारकांवर कठोर कारवाई करावी, अशी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भूमिका होती. जेणेकरून जोडणीचे आकारलेले शुल्क कमी होईल व अधिकाधिक नागरिक तात्काळ नळजोडणी घेतील. अशी त्यामागची भावना होती. या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची भूमिका कायम राहण्याची शक्यता असून सोमवारी (ता.१७) नळजोडणीच्या नव्या धोरणाबद्दल महापालिका अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - जनावरे चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात

यामुळे नळजोडणीचे दर चर्चेत
महापालिकेने अनामत रक्कम २००० व नळजोडणी घर नऊ हजार असे एकूण अकरा हजार रुपये शुल्क निश्चित केले होते.परंतु त्यानंतर नगरसेवक सचिन देशमुख व प्रसाद नागरे यांनी ह्या नळजोडणीचे दर कमी करावेत म्हणून महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर मात्र, शहरातील अनेक संघटना, विविध सोसायटीतील नागरिक ,शिवसेना व भारतीय जनता पक्ष व सचिन अंबिलवादे, चंद्रकांत शिंदे या नगरसेवकांनी देखील या नळजोडणी दारास विरोध करून दर कमी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पालिकेचे आयुक्त रमेश पवार तसेच आमदार सुरेश वरपुडकर यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली होती. तसेच नळ जोडणीचे काम पालिकेने प्लंबरला प्रशिक्षण द्यावे व त्यांच्यामार्फत करावे जेणेकरून नळजोडणीअधिकचा खर्च नागरिकांना लागणार नाही अशी भूमिका मांडली होती .या पार्श्वभूमीवर महापालिकेत शनिवारी बंद दाराआड बैठक झाली होती. या बैठकीत रविवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेऊन चर्चा करण्याची भूमिका सर्व नेते पदाधिकारी यांनी घेतली होती.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divisional Commissioners took over the officers