esakal | दिव्यांग वडिलांच्या मुलाची गुरूडझेप, नीट परीक्षेत मिळविले यश
sakal

बोलून बातमी शोधा

Rohan Jagtap

एकदा ध्येय ठरवील की कितीही संकटे आली तरी जिद्द कायम ठेवत ध्येयाकडे वाटचाल केली तर यश मिळतेच. हे एका दिव्यांग पालकाच्या मुलाने दाखवून देत नवा इतिहास रचला आहे.

दिव्यांग वडिलांच्या मुलाची गुरूडझेप, नीट परीक्षेत मिळविले यश

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : एकदा ध्येय ठरवील की कितीही संकटे आली तरी जिद्द कायम ठेवत ध्येयाकडे वाटचाल केली तर यश मिळतेच. हे एका दिव्यांग पालकाच्या मुलाने दाखवून देत नवा इतिहास रचला आहे. मुलांनी वैद्यकीय शिक्षण नीट परीक्षा देऊन एमबीबीएस डॉक्टर व्हावे हे वडिलांनी स्वप्न बघितले होते. ते पूर्ण झाले. यशाचा पाठलाग करताना अडचणी आल्या. त्यावर मात करीत पुढे गेलो. निराश कधीही झालो नाही. नीट परीक्षेत मिळालेले यश कठोर परिश्रमाच फळ आहे. ध्येय ठरवा, मेहनत घ्या, यश तुमचेच आहे, असे यशाचे गुपीत नीट परीक्षेत ७२० पैकी ६४५ गुण मिळवून देशात ४०७ वा क्रमांक मिळविलेल्या तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रोहन जगताप या विद्यार्थ्याने सांगितले.

कोरोनाने थांबवला ‘आई राजा उदो उदो’चा जयघोष! तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे भाविक दिसेनात


पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणाऱ्या पालकांच्या धावपळी आणि कसरती पाहून सामान्य पालकांच्या मुलांत भिती निर्माण व्हावी अशी अवस्था आजच्या स्पर्धेच्या युगात पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक पालक हा आपल्या पाल्यासाठी त्याच्या पहिल्या वर्गापासून एमबीबीएस किंवा मोठे अधिकारी व्हावे. याचे स्वप्न पाहून त्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. अगदी पहिली पासून पाल्याच्या चांगल्या सवयीपासून ते त्याच्या अभ्यासापर्यंत काटेकोर आचारसंहितेत वावरताना दिसतो. पण ज्याला पहिलीच्या वर्गात वडिलांनी स्वतः शाळेत नेऊन सोडावे.

त्याच्यावर दररोज वडिलांनाच त्यांच्या कार्यालयात हाताला धरून सोडावे लागते. त्याच्याकडून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेतील यशाची अपेक्षा वावगीच ठरावी. पण शिक्षणातील कठीण परीक्षेतील यशासाठी आवश्यक सद्यःस्थितीतील सर्व सुखसुविधेचे निकष आणि पाल्यावर प्राथमिक शिक्षणापासून  दिले जाणारे दडपण आणि अवास्तव काटेकोरपणांची आचारसंहिता या सर्व गोष्टींना खोटं ठरवत नीट परीक्षेत उज्ज्वल यश मिळवून एका दिव्यांग पालकाच्या मुलाने भावी विद्यार्थी आणि पालकांना एक नवीनच आगळावेगळा संदेश आपल्या यशातून दिला आहे.

उद्यापासून शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानीची करणार पाहणी   

वडील गटशिक्षण कार्यालयात सेवक
तालुक्यातील कन्हेरवाडी येथील रोहन बिभीषण जगताप याचे वडील जन्मतः दोन्ही डोळ्यांनी अंध असून ते कळंब येथे गटशिक्षण कार्यालयात सेवक म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असताना या विद्यार्थ्याने फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर यश संपादन करताना त्याने नीट परीक्षेत ७२० पैकी ६४५ गुण मिळवून देशात ४०७ वा क्रमांक मिळवला. प्रत्येक मुलास वडिलांचा आधार असतो. पण अगदी प्राथमिक शालेय वयापासून वडिलांचा आधार बनत त्याने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथी, कळंबच्या लता मंगेशकर शाळेत पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून अकरावी आणि बारावी लातूर येथे दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केली. रोहनची संघर्षातून मिळवलेल्या या उज्ज्वल यशाची ही यशोगाथा परिसरातील विद्यार्थी, पालक यांना खूपच प्रेरणादायी ठरत असून रोहन आणि त्याच्या पालकांचे समाजाच्या सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संपादन - गणेश पिटेकर