दिव्यांगांचे 'भीक मागो' आंदोलन, औसा नगरपालिका घेणार का दखल?

जलील पठाण
Monday, 5 October 2020

दिव्यांगाना पाच टक्के देण्याचे नियम असताना औसा नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांचा डेमो धनादेश देऊन प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपयेच वर्ग केले. बाकी रक्कम मिळावी यासाठी शहरातील दिव्यांगांनी वारंवार पालिकेकडे पाठपुरावा केला.

औसा (जि.लातूर) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास निधीतून पाच टक्के निधी हा दिव्यांगाना पाच टक्के देण्याचे नियम असताना औसा नगरपालिकेने दोन वर्षांपूर्वी पाच हजार रुपयांचा डेमो धनादेश देऊन प्रत्यक्षात त्यांच्या खात्यावर दीड हजार रुपयेच वर्ग केले. बाकी रक्कम मिळावी यासाठी शहरातील दिव्यांगांनी वारंवार पालिकेकडे पाठपुरावा केला. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून त्यांची फसवणूक केली गेली.

जालन्यात आयपीएल सामन्यांवर सट्टेबाजी सुरूच, बुकीला स्थानिक गुन्हे शाखेने केले...

पालिकेकडे जर निधी नसेल तर आम्ही भीक मागतो आणि त्यातून जमा झालेली रक्कम पालिकेला देतो अशी भूमिका घेत औशात सोमवारी (ता.पाच) शहरात भीक मागो आंदोलन केले आणि त्यातून जमा झालेली रक्कम पालिकेला देण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम स्वीकारली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधील पाच टक्के निधी हा दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. औसा शहरातील दिव्यांगाना या बाबत दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पाच हजारांचा डेमो धनादेश देण्यात आला.

त्याची जाहिरातबाजीही झाली आणि दोन चार दिवसांत ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा होईल असे सांगितले. मात्र खात्यावर फक्त दीड हजार रुपये जमा करण्यात आले. दिव्यांगांच्या वतीने उर्वरित साडेतीन हजार रुपयासाठी सतत पाठपुरावा आणि उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पालिकेने या दिव्यांगांना झुलवत ठेवले.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा, उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयातील चित्र

हक्काचा निधी मिळत नसल्याने संतापलेल्या दिव्यांगानी सोमवारी औसा शहरात भीक मागो आंदोलन केले आणि भीक मागून जमलेले एक हजार ६२५ रुपये पालिकेच्या अधिकाऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेकडून ही रक्कम स्वीकारली गेली नाही. लवकरच उर्वरित रक्कम दिव्यांगांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत असले तरी सोमवारी दिव्यांगांनी केलेल्या भिकमागो आंदोलनाने पालिकेची या दिव्यांगाप्रति असलेली असंवेदनशीलता शहराने पाहिली.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Divyang's Bhik Mago Andolan Against Ausa Municipal Council Latur News