esakal | Diwali 2020 : उस्मानाबाद जिल्ह्यात वाहनांची खरेदी-विक्री सुसाट, ग्राहकांनी साधला दिवाळी मुहूर्त
sakal

बोलून बातमी शोधा

Automobile

कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या वाहन बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य दिसून आले. अक्षयतृतीय्या, दसरा हे महत्त्वाचे मुहूर्त कोरोनाच्या सावटाखालीच गेले.

Diwali 2020 : उस्मानाबाद जिल्ह्यात वाहनांची खरेदी-विक्री सुसाट, ग्राहकांनी साधला दिवाळी मुहूर्त

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : कोरोनामुळे मागील आठ महिन्यांपासून ठप्प असलेल्या वाहन बाजारात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चैतन्य दिसून आले. अक्षयतृतीय्या, दसरा हे महत्त्वाचे मुहूर्त कोरोनाच्या सावटाखालीच गेले. पण, दिवाळीत वाहनविक्रीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात वाहन खरेदी-विक्रीतून १८ ते २० कोटींची उलाढाल झाली. वाहन खरेदीसाठी उडालेली झुंबड पाहता अनेक ठिकाणी वाहनाचा पुरवठासुद्धा कमी पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Diwali Padwa 2020 : पाडव्या निमित्ताने बाजारपेठेत अडीचशे कोटींची उलाढाल


कोरोनाचा संसर्ग आता हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे बाजारपेठाही पूर्वपदावर येत आहेत. मधल्या काळात रोजगार जाणे, वेतन कपात अशा धक्क्यांतून सावरलेला सर्वसामान्य ग्राहक आता वाहनांच्या खरेदीचे बेत आखत असल्याचे समाधानकारक चित्र पाहायला मिळू लागले आहे. यामध्ये व्यावसायिक व आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातही दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मागणीत चांगलीच वाढ झाली आहे. नव्या कोऱ्या वाहनांबरोबरच ग्राहकांकडून रिसेल वाहनांना पसंती दिली जात आहे. गॅरेजमध्ये विक्रीसाठी अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या आणि नव्याने विक्रीसाठी आलेली सर्व वाहने लगेचच विकल्या जात असल्याचे या क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितले.

जिल्ह्याचा विचार केला तर दिवाळीच्या तीन दिवसांमध्ये दुचाकीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या १,१०० ते १,२०० वाहनांची विक्री झाली. त्यातून आठ ते दहा कोटींची उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे १२५ चारचाकी वाहनांची विक्री झाली, त्याची किंमत आठ ते दहा कोटींच्या घरात आहे. ग्राहकांची मागणी जास्त व कंपन्यांचा पुरवठा कमी अशीही परिस्थिती यंदा पाहायला मिळत आहे. अत्यंत वेगाने बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे.
- अमित मोदानी, होंडा कंपनीचे डीलर
 

संपादन - गणेश पिटेकर