रेल्वे पोलिसाचे चोरी गेलेले पिस्तूल सापडेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

आरपीएफच्या जवानाच्या पिस्तूल चोरीविषयी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल आहे. याचा तपास जलदगतीने सुरू आहे. नांदेड ते मनमाडपर्यंत चौकशी आणि धरपकडीचे काम लवकरच करणार आहोत.
- डी. बी. कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक, लोहमार्ग पोलिस

औरंगाबाद - नांदेड-नगरसोल रेल्वेतून आरपीएफचे जवान आरीफ मैनोद्दीन शेख यांच्या निष्काजीपणामुळे चोरी गेलेले पिस्तूल पाच दिवस झाले, तरीही सापडलेले नाही. दहा काडतुसांनी भरलेले हे पिस्तूल खरेच चोरी गेले की विकले, याचा लोहमार्ग पोलिस कसून तपास करत आहेत.

नांदेड-नगरसोल रेल्वेत निगराणीसाठी जवान आरीफ मैनोद्दीन शेख यांना मंगळवारी (ता. 29) तैनात करण्यात आले होते. नांदेडकडून आलेल्या रेल्वेत औरंगाबाद स्थानकावरून आरीफ शेख बसले. औरंगाबाद ते परसोडा दरम्यान त्यांच्या कमरेला लावलेले हे पिस्तूल चोरी गेले. हा प्रकार लक्षात येताच आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी धमेंद्र कुमार यांनी आरीफ यांना तत्काळ निलंबित केले. आजारी असल्यामुळे ते रजेवर असल्याचे कारण आरपीएफ अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असले, तरी कर्तव्य बजावत असताना गोळ्यांनी भरलेले पिस्तूल चोरीला जातेच कसे, अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणी बुधवारी (ता. 30) गुन्हा दाखल झाला, तरी अजून पिस्तूल मिळालेले नाही. मनमाड ते परभणीपर्यंत हद्द असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी आतापर्यंत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला आहे; मात्र या पिस्तुलाचा शोध लावण्यात अद्याप यश का मिळत नाही, हा संशोधनाचा विषय बनला आहे.

आजारी होते तर सुटी का घेतली नाही?
आरपीएफचे जवान आरीफ शेख आजारी असल्याने त्यांना झोप लागली आणि त्यांचे पिस्तूल चोरीला गेले, असे सांगितले जात आहे; मात्र आजारी असताना ते कामावर का आले, झोपताना आपल्या सहकाऱ्याला माहिती दिली का, आजारी असल्याची माहिती वरिष्ठांना का दिली नाही, असे अनेक प्रश्‍न याविषयी उपस्थित होत आहेत. औरंगाबाद विभागात पहिल्यांदाच जवानाच्या कमरेचे पिस्तूल चोरी जाण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. याविषयी नांदेड विभागाचे वरिष्ठ अधिकारी तपास करत आहेत. आरपीएफचे औरंगाबाद स्थानकाचे प्रमुख धर्मेंद्र कुमार यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकलेला नाही.

Web Title: do not receive railway police gun theft