उपाययोजना करूनही थांबेना वीजचोरी

प्रकाश बनकर
रविवार, 23 एप्रिल 2017

"महावितरण'तर्फे राज्यात पावणेदोन लाख छापे; हजार जणांवर गुन्हे दाखल

"महावितरण'तर्फे राज्यात पावणेदोन लाख छापे; हजार जणांवर गुन्हे दाखल
औरंगाबाद - वाढत्या ग्राहकांमुळे विजेची मागणीही झपाट्याने वाढत आहे. "महावितरण'शी वर्षभरात दहा लाख नवीन ग्राहक जोडले गेले, हे त्याचे द्योतक. दुसरीकडे नाना उपाय करूनही वीजचोरी, वीजगळतीची डोकेदुखी कायम आहे. ते रोखण्यात "महावितरण'ला अद्याप यश आलेले नाही. नव्या तंत्राची कास धरली तरी आकडे, मीटरमध्ये फेरफार यांसारख्या प्रकारांनी वीजचोरी सुरूच आहे. राज्यात असलेली 14.51 टक्‍के वीजहानी तेच सांगते. ठोस उपाययोजनांसह ग्राहकांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत हा प्रश्‍न सुटणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

"महावितरण'चे अडीच कोटी ग्राहक आहेत. वाढते ग्राहक, वाढत्या मागणीचा समतोल साधण्यासाठी वीजचोरी, गळती रोखणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात "महावितरण'ने अनेक चांगले उपक्रमही राबवलेत. नवीन मीटर देणे, घरातील मीटर घराबाहेर दर्शनी ठिकाणी लावणे, फोटो काढून रीडिंग घेणे, मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून रीडिंग व बिल भरण्याची सोय इत्यादींचा समावेश आहे. राज्यात सात लाखांपेक्षा अधिक ग्राहक मोबाईल ऍप्स वापरत आहेत. तरीदेखील राज्यातील एकूण विजेच्या तुलनेत तेवढी वसुली होत नाही. विकल्या जाणाऱ्या विजेची महावितरण व्यवस्थित नोंद ठेवत नसल्याची बाबही समोर आली आहे.

कायद्यातील बदलानुसार, विजेची चोरी दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे आता गुन्हे दाखल होत आहेत. राज्यात चोरी पकडण्यासाठी पूर्वी केवळ 29 पथके होती. आता ती 122 वर आहेत. "महावितरण'ची सहा ठिकाणी समर्पित पोलिस ठाणी आहेत. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर असलेल्या भागात "ऑटोमॅटिक मीटर रीडिंग' (एएमआर) यंत्रणा बसवली आहे.

त्याद्वारे वीजचोरीवर नियंत्रण ठेवता येते. परिमंडळ स्तरावर भरारी पथके, दामिनी पथके कार्यरत आहेत. प्रत्येक शाखा अभियंत्यास चोरी पकडण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट आहे. कर्मचाऱ्यांमधील समन्वयातून वीजचोरीवर कारवाई होत आहे.

पावणेदोन लाख छापे
राज्यात गेल्या वर्षी एक लाख 70 हजार ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यापैकी 49 हजार ठिकाणी वीजचोरी आढळली. एक हजार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. वीजचोरीमुळे थकलेल्या 31 कोटींपैकी 12 कोटींची वसुली झाली, तर 22 हजार प्रकरणे तडजोडीने निकाली काढली गेली. त्यातून 10 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

अशी होते वीजगळती
- जुन्या वाहिन्या, जुन्या ट्रान्सफॉर्मरमुळे पाच टक्‍के गळती
- आकडे टाकून सात टक्‍के वीजचोरी
- मीटरमध्ये फेरफार, अन्य मार्गाने 2.51 टक्‍के चोरी, हानी.

परिमंडळनिहाय वीजगळती
परिमंडळ------------ वीजगळती (टक्के)
अकोला---------------19.48
औरंगाबाद------------- 16.66
भांडुप---------------- 14.71
जळगाव--------------- 22.93
कल्याण--------------- 10.85
कोकण--------------- 15.80
कोल्हापूर---------------12.54
लातूर---------------18.67
नागपूर (अर्बन)--------- 10.10
नांदेड---------------21.29
नाशिक---------------16.29
पुणे-------------------8.92
बारामती---------------- 14.12
अमरावती---------------15.18
चंद्रपूर---------------11.79
गोंदिया---------------16.61

सरासरी एकूण वीजगळती 14.51 टक्के

वेगवेगळ्या पद्धतीने होणारी वीजचोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. आधुनिक तंत्राच्या वापराने मीटरमधून होणारी वीजचोरी कमी झाली आहे. परिमंडळनिहाय दामिनी पथक, भरारी पथके कार्यरत आहेत. तपासणी, वीजचोरी पकडण्याचे प्रत्येक शाखा अभियंत्यांनाही उद्दिष्ट दिले आहे. मोबाईल ऍप्स, तसेच भरारी पथकांद्वारेही वीजचोरी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता, औरंगाबाद परिमंडळ

प्रतिक्रिया
उन्हाळा आणि परीक्षा एकाच काळात येतात. याच काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने अभ्यासात व्यत्यय येतो. आकडे टाकून वीज चोरणाऱ्यांमुळे अनेक भागांत भारनियमन केले जाते. चूक नसतानाही त्याचा त्रास अन्य ग्राहकांना सहन करावा लागतो.
- शीतल पाटील, यिन सदस्य, औरंगाबाद.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विजेची पुरेशी सुविधा मिळत नाही, याचा खेद वाटतो. अशावेळी ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा कशी करणार? बोटावर मोजण्याएवढे लोक वीजचोरी करतात, म्हणून सरसकट भारनियमन केले जाते. फक्त वीजचोरी करणाऱ्यांनाच शिक्षा व्हावी, त्याचा त्रास इतरांना होऊ देऊ नये.
- सुदर्शना जाधव, तनिष्का सदस्य, औरंगाबाद.

Web Title: do not stop electricity theft