कोरोनाशी हिमतीने लढणाऱ्या डॉक्टर योद्ध्यांना प्रशासनानेच केले हतबल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बीड - कोरोना विषाणूची महामारी सुरू झाली आणि सरकारला डॉक्टरांमध्ये देव दिसला. सरकारनेच डॉक्टरांना कोरोना योद्धा अशी पदवीही बहाल केली. चोहोबाजूने समाज आणि शासन या कोरोना योद्ध्यांना प्रोत्साहन देत आहे. मंत्री टोपेंकडून तर हे काम अधिकच होत असताना त्यांच्या खात्याच्या आरोग्य संचालनालयाने मात्र या कोरोनाशी हिमतीने लढणाऱ्या डॉक्टरांना हतबल केले आहे.

अगदी, ‘नैराश्य येऊन माझी मानसिक स्थिती ढासळत चालली आहे. या मानसिक अस्वस्थतेतून माझ्या हातून माझे काही बरेवाईट होण्याचाही धोका आहे,’ अशी हतबलता या आरोग्य संचालनालयातील ‘दफ्तर दिरंगाई’ व ‘खाबुगिरी’मुळे आली आहे.
वैद्यकीय अधिकारी गट - अ पदावर असलेल्या व सेवांतर्गत पदव्युत्तर पदवी व पदविका प्रशिक्षण घेणाऱ्या अडीचशेंवर अधिकाऱ्यांचा हा प्रश्न आहे. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून कोरोनाच्या महामारीत हा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी गट - अ पदावर नियुक्ती असलेल्या डॉक्टरांची सेवांतर्गत वैद्यकीय पदवी वा पदविका प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर त्यांची सेवा आरोग्य संचालनालयाकडे वर्ग करून तिथे प्रतिनियुक्ती केली जाते. या अधिकाऱ्यांच्या वेतनासह इतर भत्ते, देयके अदा करण्याचे काम आरोग्य संचालनालयाचे आहे. मात्र, नियमित वेतन वगळता या अधिकाऱ्यांना मागच्या काळात वेतनवाढ फरक, महागाई भविष्य निर्वाह निधीच्या पहिल्या हप्त्याची थकबाकी तसेच महागाई भत्त्याची थकबाकी आणि अनेकांची वैद्यकीय बिलेच मिळाली नाही.

रकमा मिळण्यासाठी या डॉक्टर मंडळींनी आरोग्य संचालनालयाचे उंबरठेही झिजवून झाले. पण, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली नाही. विशेष म्हणजे प्रतिनियुक्तीवर असलेले सर्वच वैद्यकीय अधिकारी हे एकतर जिल्हा रुग्णालय वा वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असल्याने त्यांच्या कोरोना वॉर्डमध्ये ड्युट्या आहेत. एकीकडे कोरोनाशी खंबीरपणे लढणाऱ्या या डॉक्टरांना अशी हतबल होण्याची वेळ आली आहे. पुण्यातील औंधच्या जिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञ पदविकेचे प्रशिक्षण घेत असलेल्या डॉ. प्रमोद सपाटे या वैद्यकीय अधिकाऱ्याने शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन तक्रारीतून आपल्या हतबलतेने वाट मोकळी करून दिली आहे. कोरोनाच्या महामारीत या कोरोना योद्ध्यांना न्याय मिळणार का, असेच हतबलतेने लढत राहावे लागणार? हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - इंजिनिअरिंग, वेल्डिंग व्यवसायावर संक्रांत

हरकत देऊनही वेतन घेतले
दरम्यान, एप्रिल महिन्यातही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनाची कपात केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन दिवसांचे वेतन घ्यायचे ठरविल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हरकती मागविण्यात आल्या. हरकती कळविलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचेही वेतन कपात करण्यात आले. मग, एकीकडे कोरोना योद्धा म्हणणारे सरकार योद्ध्यांशीच असे वागत असेल तर या महामारीचा सामना नेमके कोणाच्या जिवावर करणार, असा सवाल आहे.

‘मी वारंवार आपल्या कार्यालयात चकरा मारून पाठपुरावा केला. मात्र, जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक मागणीचे प्रकारही घडले आहेत. सध्या माझी कोविड-19 (आयसीयू) विभागात नेमणूक असल्याने व लॉकडाऊन सुरू असल्याने मला अलीकडे आपल्या कार्यालयात येता आले नाही. सध्या माझी आर्थिक परिस्थिती बिकट हेात चालली असून माझ्या वेतनातून कपात होणारे कर्जाच्या हप्त्यांमुळे मला बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नैराश्य येऊन माझी मानसिक स्थिती ढासळत चालली आहे. या मानसिक अस्वस्थतेतून माझ्या हातून माझे काही बरेवाईट होण्याचाही धोका आहे,’ अशी तक्रार एका वैद्यकीय अधिकाऱ्याने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या आपले सरकार या पोर्टलवर केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com