हिंगोलीकरांनो घाबरू नका, काळजी घ्या

korana
korana

हिंगोली : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण गुरुवारी (ता. दोन) आढळून आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात आखणी चार रुग्ण संशयित असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे लाकडाउनच्या काळातही बेजबाबदारपणे घराबाहेर पडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आता तरी आपली व कुटुंबीयांची काळजी घ्यावी, अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

देशभरात कोरोना विषाणूचा धुकाकूळ सुरू आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. नागरिकांनी घरात राहावे, खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले जात आहे. पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांत कामानिमित्त गेलेल्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतलेल्या ग्रामस्थांची आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली आहे.

विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र

 आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी, पोलिस प्रशासनही रात्रंदिवस कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, याकडे नागरिक दुर्लक्ष करीत असून विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे अजूनही नागरिकांनी गाभीर्यांने घेतलेले नव्हते. जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून दाखल झालेल्या काही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे नागरिकांच्या बेशिस्तीत आणखी भर पडली होती. 

कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह 

मात्र, गुरुवारी एका कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बेशिस्त राहणाऱ्या नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. गुरुवारी दुपारनंतर प्रत्येकजण आपल्या व आपल्या कुटुंबीयांची काळजी करताना दिसून येत होता. शासन व प्रशासनातील अधिकारी रात्रंदिवस आपल्यासाठी का झटत आहेत, याचे गांभीर्य कळाले. दरम्यान, कोरोनाचा रुग्ण आढळून आला असता तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. 

घरीच राहिल्यास कोरोनाची साखळी तोडता येते

शासनाच्या सूचनांचे पालन केल्यास कोरोना विषाणूचा फैलाव रोखता येतो, घरीच राहिल्यास कोरोनाची साखळी तोडता येते, त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक साहित्याची खरेदी करताना दुकानाबाहेर आखलेल्या वर्तुळात उभे राहूनच खरेदी करावे, सोशल डिस्टन्स पाळावे, असे आवाहन केले जात आहे.


पाच संशयितांवर उपचार

येथील जिल्हा रुग्णालयात पाच संशयित दाखल असून त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर आणखी चार जण संशयित आहेत. त्यापैकी तिघाचे स्वॅब नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या तिघांचे अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्‍हा सामान्य रुग्णालयात (ता. २९) मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या दहा लोकांना होम क्‍वॉरंटाइन (घरात विलगीकरण ) करण्यात आले होते. त्‍यांचा होम क्‍वॉरंटाइन कार्यकाळ संपला आहे. 

नियंत्रण कक्षाची स्‍थापना

या नागरिकांत फिलिपाईन्स येथून आलेल्या तीन, सौदीअरेबिया एक, जर्मनी एक, ऑस्‍ट्रेलिया दोन, मालदिव दोन, कझागिस्‍तान येथून आलेल्या एक नागरिकांचा समावेश आहे. सावधगिरी म्‍हणून त्‍यांना घरात राहण्याचा सल्‍ला देण्यात आला आहे. आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंध व उपाययोजनेबाबत नियंत्रण कक्षाची स्‍थापना करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्‍थितीत मुख्यालयाच्या ठिकाणी राहून चोवीस तास सेवा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्‍हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्‍तरावर नियंत्रण कक्षाची स्‍थापना करण्यात आली आहे.

सोशल डिस्‍टन्स पाळवेत

जिल्‍ह्यात आरोग्य यंत्रणा, पोलिस प्रशासनासह महसूल व इतर कर्मचारी तत्पर आहेत. शासकीय कार्यालयात अभ्यागतांना (ता.१४) पर्यंत ‘नो एंट्री’ करण्यात आली असून तक्रारी असल्यास ई-मेलचा वापर करावा. कोणीही घराबाहरे पडू नये, बाजारातदेखील गर्दी करू नये, खरेदी करताना सोशल डिस्‍टन्स पाळवेत.
- रुचेश जयवंशी, जिल्‍हाधिकारी

 


घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे

कामाशिवाय कोणीही घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वांनी घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे. आरोग्य सेवा तत्‍पर असून कोणी घाबरून जाण्याचे काही कारण नाही.
-डॉ. किशोरप्रसाद श्रीवास, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक


विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने होणार जप्त

जिल्‍ह्यात विनाकारण रस्‍त्‍यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यापुढे विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त केली जाणार आहेत. जिल्‍ह्यात (ता.१४) पर्यंत संचारबंदी लागू आहे. त्‍यामुळे प्रवास करणे टाळावे, घरीच बसून प्रशासनाला सहकार्य करावे.

-योगेशकुमार, पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com