esakal | दिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli collector office

दिल्‍ली येथे झालेल्या ‘तबलिगे जमात’च्या धार्मिक कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जण सहभागी झाले होते. त्‍यापैकी अकरा जण दिल्‍लीतच असून हिंगोलीत परतलेल्या एकावर जिल्‍हा सामान्य रुग्णायात उपचार करण्यात येत आहेत.

दिल्लीतील कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जणांचा समावेश

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर/विनायक हेंद्रे

हिंगोली : दिल्‍ली येथे झालेल्या ‘तबलिगे जमात’च्या धार्मिक कार्यक्रमात हिंगोलीतील बारा जण सहभागी झाले होते. त्‍यापैकी अकरा जण दिल्‍लीतच असून हिंगोलीत परतलेल्या एकावर जिल्‍हा सामान्य रुग्णायात उपचार करण्यात येत असून त्‍याचे स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली.

दिल्‍ली येथे हजरत निजामुद्दीन भागात असलेल्या ‘तबलिगे जमात’ या धार्मिक संस्थेच्या मेळाव्यामध्ये अनेक जण सहभागी झाले होते. याच मेळाव्यादरम्यान २४ जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाले असून त्यांच्यामार्फत हा विषाणू अन्य भागात पोचण्याचा संशय व्यक्त होत आहे. याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हिंगोलीतील बारा जण दिल्लीला गेले होते. त्यातील एकजण हिंगोलीला परतला आहे, तर अन्य अकरा जण दिल्लीतच आहेत.

हेही वाचा निर्जंतुकीकरणासाठी खासदार हेमंत पाटील रस्त्यावर

स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे तपासणीसाठी

 हिंगोलीला परत आलेल्या एकावर जिल्‍हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले आहे. त्‍याचे स्‍वॅब नमुने औरंगाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी दिली. दरम्‍यान, जिल्‍हा सामान्य रुग्णालयात असलेल्या दोन कोरोना संशयितांचा अहवाल बुधवारी सहा वाजेपर्यंत आला नव्हता. रात्री सात वाजेपर्यंत अहवाल येणार असल्याचे डॉ. गोपाल कदम यांनी सांगितले.

तेलंगाणातील १२० कामगार घेतले ताब्यात

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील चेकपोस्‍टवर दिल्ली येथून तेलंगणा राज्यात जाणाऱ्या १२० कामगारांना मंगळवारी (ता. ३१) रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना वरुड तांडा येथील आदिवासी आश्रम शाळेत ठेवण्यात आले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्‍था करण्यात आली आहे.

करडी नजर ठेवण्याच्या सूचना

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सीमा बंद करण्यात आल्या आहेत. आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथे चेक पोस्ट करण्यात आला असून या ठिकाणी वाहनांची व पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतले जात आहे. चेक पोस्टवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक विकास थोरात, सहायक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकरी यांनी दिल्या आहेत.

वाहनांची कसून तपासणी

 त्यानुसार हिवरा येथील चेकपोस्‍टवर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय रस्त्याने पायी जाणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री दिल्ली येथून तेलंगणा राज्याकडे जाणारे १२० मजूर पोस्टवर थांबविण्यात आले. जमादार भगवान वडकिले, संजय मार्के, प्रभाकर भोंग, श्री. बाबळे, शेख बाबर यांच्या पथकाने या मजुरांची चौकशी केली. 

येथे क्लिक करालॉकडाउनचा रेशीम उत्‍पादकांना फटका

भोजनाची व्यवस्था

त्यांनी दिल्ली येथून तेलंगणा राज्यात जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन वरुड तांडा येथील आदिवासी आश्रम शाळेत ठेवले आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या भोजनाची व्यवस्थादेखील करण्यात आली. काही मजूर थांबण्यास नकार देत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. बहुतांश मजूर तेलंगणा राज्याकडे निघाले आहेत.

संचारबंदीचे उल्‍लंघन करणाऱ्या १४ जणांवर गुन्हे

हिंगोली : जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी (ता. १४) एप्रिलपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी १४ जणांनी ठिकठिकाणी या आदेशाचे उल्‍लंघन केले. यात वसमत शहरात तीन, हिंगोलीत एक, सेनगाव चार, कळमुनरी तीन, हट्टा एक, औंढा नागनाथ एक, गोरेगाव एक, अशा एकूण १४ जणांचा समावेश आहे. या १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपती व्यवस्‍थापन कायदा २००५ नुसार बंदी लागू असताना सुद्धा आरोपीतांनी जिल्‍हाधिकारी श्री. जयवंशी यांचे आदेशाचे उल्‍लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.