कोरोनाच्या संदर्भात राजकारण नको, खासदार चिखलीकर का म्हणाले वाचा...

नांदेडला आगीत नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करताना चिखलीकर
नांदेडला आगीत नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करताना चिखलीकर

नांदेड - भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोरोनाच्या महामारीच्या प्रसंगात कोणीही राजकारण करु नये. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव थांबविण्याची गरज आहे तसेच लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पालन आणि गरजूंना मदत करणे महत्वाचे असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले.

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सिडको, हडको भागात गोरगरिब आणि गरजूंना अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्यावेळी खासदार चिखलीकर म्हणाले की, आमची एकच भूमिका असून या कोरोनाच्या महामारीत कोणीही राजकारण करु नये. राजकारण करायला जो तो आपल्या जागी सक्षम आहे. परंतू आता ही वेळ नाही. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव थांबविण्याची गरज आहे. त्याचबरोबर गोरगरिब आणि गरजूंना अन्न कसे मिळेल, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. 

लॉकडाऊनचे पालन सर्वांनी करावे
कोरोनापासून वाचण्यासाठी सध्यातरी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ता. तीन मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. त्यामुळे ता. तीन मे पर्यंत सर्वांनी लॉकडाऊनचे पालन करावे. कोरोनाला देशाच्या बाहेर घालविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. नांदेडला अद्याप तरी कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. याचे श्रेय नांदेड जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनासह अत्यावश्‍यक सेवेतला आरोग्य, स्वच्छता विभाग आणि प्रसारमाध्यमे, पत्रकार यांना आहे. यात कुणाचे व्यक्तिगत श्रेय नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूला सीमेवर कोरोना आला आहे. चारही बाजूंनी कोरोनाने वेढले असल्यामुळे सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.  

भाजपतर्फे दिली अनेकांना मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार, खासदार व पदाधिकारी यांना आपआपल्या जिल्ह्यात राहून मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आपआपल्या जिल्ह्यात कुणीही जेवणापासून वंचित राहू नये, यासाठी काम सुरु असल्याचे खासदार चिखलीकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७० हजारहून अधिक लोकांना भाजपतर्फे धान्य पुरवले आहे. खासदार या नात्याने मी दहा हजारच्यावर किट दिले. लातूरच्या खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी दोन हजार, माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी अडीच हजार, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी पाचशे धान्याचे किट दिले. नगरसेविका इंदूताई घोगरे व संजय पाटील घोगरे यांनी ५१ क्विंटल तांदूळ दीड हजार लोकांना मोफत वाटप केला आहे. 

आगपिडीत व्यापाऱ्यांना दिलासा
लातूरफाटा येथील व्यापारी संकुलला लागलेल्या आगीत २५ दुकाने भस्मसात झाली होती. ही माहिती कळाल्यानंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळास भेट देवून नुकसानीची पाहणी केली व आगपीडीत व्यापाऱ्यांना दिलासा देवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे महानगराध्यक्ष प्रविण साले, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, माजी नगरसेवक राजू पाटील गोरे, उपायुक्त सुधीर इंगोले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com