प्रवाशी नागरिकांवर ‘ही’ समिती ठेवणार आता वॉच

file photo
file photo

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात ॲन्टी कोरोना कवच फोर्सची स्थापना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशाद्वारे नुकतीच केली आहे.

प्रवाशी नागरिकांची माहिती कळविण्याचे आवाहन
जिल्ह्यात ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात परदेशातून, परराज्यातून व जिल्ह्याच्या बाहेरुन प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी स्वत:हून त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाला देवून त्यांनी प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन घेतली नाही, अशा व्यक्तींची माहिती त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना ओळखणाऱ्या नजीकच्या व्यक्तींनी संबंधित तहलिसदार यांना कळविण्यात आले होते.  

पायवाट व इतर मार्गाने हद्दीत प्रवेश
जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच मनपा आयुक्त यांच्या समवेत जिल्ह्यात काही भागात पाहणी करीत असतांना काही लोक गावात, नागरी क्षेत्रात पायवाट व इतर मार्गाने जिल्ह्याच्या बाहेरुन प्रवेश करीत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींची वैद्यकीय तपासणी न होता असे लोक गावात, नागरी भागातील इतर लोकांमध्ये मिसळल्यामुळे त्यांच्यापासून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले उपाय योजनेबाबतचे प्रयत्न निष्फळ होवून अशा लोकांपैकी कदाचित एखादी व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्यास त्यांच्यापासून समाजातील इतर लोकांना प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्रिस्तरीय फोर्सची स्थापना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ॲन्टी कोरोना कवच फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्याची रचना व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे. ग्राम पातळीवरील समितीची रचना : संबंधित गावचे तलाठी - अध्यक्ष, संबंधीत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वयंसेवक (एनजीओ, एनएसएस, एनसीसी आदी)- सदस्य तर पोलीस पाटील हे सदस्य सचिव आहेत.  नागरी (नगरपालिका, नगरपंचायत) क्षेत्रातील रचना : संबंधित वार्डाचे वसूली लिपीक– अध्यक्ष, संबंधित मुख्याधिकारी यांनी एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक इ. यांचा व त्यांना आवश्यक व्यक्तींचा त्यांच्या स्वेच्छेने  समावेश करावा- सदस्य तर संबंधीत वार्डाचे स्वच्छता निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत. नागरी (महानगरपालिका) क्षेत्रातील रचना : संबंधित वार्डाचे वसुली लिपीक– अध्यक्ष, संबंधित संबंधित उपायुक्त यांनी एनसीसी, एनएसएस, स्वयंसेवक तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक इ. यांचा व त्यांना आवश्यक असलेल्या व्यक्तींचा त्यांच्या स्वेच्छेने समावेश करावा- सदस्य, तर संबंधीत वार्डाचे स्वच्छता निरीक्षक हे सदस्य सचिव आहेत.

समित्यांची कार्यपद्धती
ग्रामीण भागात परदेशातून, परराज्यातून, जिल्ह्याबाहेरुन प्रवास करुन आलेल्या व्यक्तींबाबत करावयाची कार्यवाही : गावातील स्वयंसेवक एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी तसेच नेहरु युवा केंद्राचे स्वयंसेवक किंवा गावातील स्वयंसेवी संस्था यांच्या सह्याने अध्यक्षांनी गावाच्या प्रवेश व निकास द्वाराच्या ठिकाणी तपासणी पथकाची नेमणुक तीन शिफ्टमध्ये २४ तास करावी. अशा पथकासाठी आवश्यक भासल्यास सावलीसाठी टेन्टची व्यवस्था करावी. संबंधीत पथकातील स्वयंसेवकाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक इ. नियुक्ती आदेशाच्या प्रतीसह संबंधीत तहसिल कार्यालयास सादर करावे. अशा व्यक्तींची वैद्यकीय पथक येईपर्यंत गावातील समाज मंदिर, शाळा इत्यादी वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी. या व्यक्तींची तात्काळ संबंधीत वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करुन घेण्यात यावी. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार, या व्यक्तीस प्रादुर्भावाची लक्षण दिसून आली नसल्यास त्यास गृह अलगीकरण करावे किंवा तशी व्यवस्था नसल्यास त्यास नजीकच्या कॅम्पमध्ये किंवा गावातील समाज मंदिर, शाळा याठिकाणी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करावी. तपासणीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे किंवा संशयास्पद स्थिती आढळून आल्यास त्यांना तात्काळ शासकीय विलगीकरण केंद्रात दाखल करावे.

बाहेरुन आलेल्यांची माहिती प्रपत्रात भरावी लागणार 
बाहेरुन आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती ग्रामीण भागासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांनी व नागरी भागासाठी वैद्यकीय अधीक्षक यांनी विहित प्रपत्रात संकलित करावी. संकलीत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी मनपा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. नागरी क्षेत्रासाठी संबंधित महापालिका आयुक्त तसेच सर्व नगरपालिक, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी वरीलप्रमाणे कार्यवाही अनुसरुन त्याचा अहवाल या जिल्हाधिकारी कार्यालयास सादर होईल याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागात याबाबत संबंधित तहसिलदार यांनी पर्यवेक्षणाची जबाबदारी पार पाडावी. औद्योगिक रहिवासी क्षेत्रात असे व्यक्ती प्रवास करुन आल्यास त्यांची तात्काळ माहिती संबंधित तहसिलदार यांना देण्याची जबाबदारी संबंधित औद्योगिक क्षेत्राच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची व सहय्यक कामगार आयुक्त यांची राहील.

तत्काळ समित्या गठीत करण्याचे निर्देश
सर्व तहसिलदार यांनी ग्रामपातळीवरील समित्यामधील सदस्यांचे नावे, भ्रमणध्वनी क्रमांक संबंधित गावात प्रसिद्ध करावीत तसेच नागरी क्षेत्रात महापालिका आयुक्त व सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी समित्या गठीत करुन त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक संबंधित क्षेत्रात प्रसिद्ध करावेत. या आदेशास तात्काळ अंमल देण्यात यावा. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल. 

आदेशाचे पालन केले नाही तर होणार कारवाइ
या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपायोजना नियम २०२० मधील तरदुत व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये व भारतीय दंड सहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच या कामात कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कुचराई, दिरंगाई केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड १९ उपायोजना नियम २०२० मधील तरतुद व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम५१ व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com