पानगाव दुहेरी खूनप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

46 जण दोषमुक्त; लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल

46 जण दोषमुक्त; लातूर जिल्हा न्यायालयाचा निकाल
लातूर - पानगाव (ता. रेणापूर) येथे भागूराम पेद्दे व बालाजी पेद्दे या पिता-पुत्रांचा खून झाल्याची घटना 2008 मध्ये घडली होती. त्यात पाच जणांना दोषी ठरविण्यात आले होते. या दुहेरी खून खटल्यातील तीन आरोपींना येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एका आरोपीने अल्पवयीन असल्याचा दावा केल्याने त्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला; तर एक आरोपी अद्याप फरारी आहे. याप्रकरणी पोलिसांनी 51 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

पानगाव येथे ता. 26 डिसेंबर 2008 रोजी रात्री भागुराम पेद्दे यांच्या घरासमोर आरोपी नासीर उस्मान पठाण शौचास बसला होता. त्याबाबत हटकल्याने आरोपीने शिवीगाळ करून धमकी दिली. त्यावरून भागुराम पेद्दे, शंकर पेद्दे व बालाजी पेद्दे हे पोलिस चौकीत अर्ज देण्यासाठी जात होते. त्या वेळी रात्री साडेदहा वाजता आरोपी नासीर उस्मान पठाण (वय 58), नसरुद्दीन ऊर्फ मुन्ना काजी (वय 35), शेख मुनीर शेख नूर (वय 62), फिरोज रहीमखॉं पठाण व युनूस सलीमखॉं पठाण याच्यासह 51 जणांनी त्यांच्यावर हल्ला करून चाकूने भोसकले. त्यात भागुराम व बालाजीचा जागीच मृत्यू झाला; तर, शंकर पेद्दे जखमी झाले होते.

याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक गोपाळ रांजणकर यांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश (दुसरे) यांच्यासमोर होऊन 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन पाच जण दोषी ठरले. न्यायालयाने आरोपी नासीर उस्मान पठाण, नसरुद्दीन ऊर्फ मुन्ना काजी, शेख मुनीर शेख नूर यांना खूनप्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्ह्यातील इतर कलमांन्वये दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपी फिरोज पठाण याने घटनेप्रसंगी अल्पवयीन असल्याचा अर्ज केल्याने त्याच्यासंदर्भातील निकाल राखून ठेवण्यात आला. आरोपी युनूस पठाण अद्याप फरारी आहे. एकूण 51 पैकी 46 आरोपींच्या विरोधात पोलिस सबळ पुरावे दाखल करू शकले नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्यात आले. याप्रकरणी जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सरकारी वकील शिवाजीराव चव्हाण यांनी सरकार पक्षाचे काम पाहिले.

Web Title: double murder case criminal life imprisonment punishment