नांदेड : दुहेरी खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात चार जणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी गुरूवारी (ता. २६) दुपारी ठोठावली आहे. 

नांदेड : शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात चार जणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी गुरूवारी (ता. २६) दुपारी ठोठावली आहे. 

शेवडी बाजीराव (ता. लोहा) येथील ईरप्पा मल्लिकार्जुन पोटफोडे व त्याचे सावत्र भाऊ तुकाराम मल्लिकार्जुन पोटफोडे व हनुमंता पोटफोडे यांच्यात शेत सर्वे नंबर ३६८ वरुन वाद होता. ता. ३० ऑगस्ट २०१२ रोजी सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान ईरप्पा हा शेतात काम करीत होता. सोबत ईरप्पाची पत्नी, गणपती, माणिका, दिगंबर, नारायण, गणपतीची पत्नी गिरजाबाई, लक्ष्मीबाई, दिगंबरचा मुलगा साईनाथ हे शेतात होते. तेव्हा तुकाराम पोटफोडे आणि हनुमंता पोटफोडे यांच्यासह २४ जण शेतात आले. त्यांनी नारायण, ईरप्पा व दिगंबर यांना लाठ्याकाठ्या, कत्ती आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण केली. या घटनेत दिगंबर पोटफोडे जागीच ठार झाला तर नारायण पोटफोडे व ईरप्पा पोटफोडे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच नारायण पोटफोडेला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

गणपती इरप्पा पोटफोडे याने सोनखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन तुकाराम पोटफोडे व हनुमंता पोटफोडेसह अन्य २४ जणांविरुध्द खूनासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास करुन कंधार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परंतु नंतर हा खटला औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने नांदेडच्या जिल्हा न्यायालयात हस्तांतरीत करण्यात आला.

जिल्हा न्यायालयाने २३ साक्षीदार तपासले. त्यापैकी काही साक्षिदार फितूरही झाले. तरीही विशेष सरकारी वकील अलका जयंत कुर्तडीकर यांनी फिर्यादीची बाजू भक्कमपणे मांडल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांनी चार जणांना जन्मठेप तर अन्य तिघींना दोन महिने शिक्षा सुनावली.

न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी मुख्य आरोपी तुकाराम पोटफोडे, बालाजी तुकाराम पोटफोडे, शिवराज हनुमंता पोटफोडे व हनमंता पोटफोडे यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच अन्य आरोपीत चंद्रकलाबाई, कमलबाई व अन्नपूर्णाबाई पोटफोडे यांना दोन महिन्याची शिक्षा सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Double Murder Case Four Peoples punishment of life imprisonment in Nanded