डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेतील ‘दामू’ हिंगोलीचा

photo
photo

वसमत: वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील एक ते दीड हजार लोकवस्ती असलेल्या बोरगाव (बुद्रुक) येथील प्रियपाल गायकवाड या कलावंताची शेतमजूर ते सिनेसृष्टीची वाटचाल ही प्रेरणादायक असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरव गाथा’ मालिकेतील ‘दामू’ भूमिका घराघरांत पोचली आहे. लवकरच तो मराठी चित्रपट, मालिका व एका रॅप साँगमध्ये झळकणार आहे. आई-वडीलांना शिक्षणाचे महत्व कळाल्यामुळेच आपण शिक्षण घेवून या क्षेतात स्थिरावत असल्याचे त्यांने सांगितले.

स्टारप्रवाह या मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरव गाथा’ मालिकेत एका अभिनेत्याने सर्वांची नजर खेचली आहे. साधी शरीर रचना, अवसत चेहऱ्याचा हा सावळा पण देखणा नट आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे ‘प्रियपाल दशरथ गायकवाड.’ प्रियपालचा अभिनय जसा साधा आणि सरळ आहे, तशी त्याची कथा अगदीच विरुद्ध. मराठवाड्यातील वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील एक ते दीड हजार लोकवस्ती असलेल्या बोरगाव (बुद्रुक) मध्ये राहणारं, एक शेत मजुराचं कुटुंब म्हणजे गायकवाड परिवार. 

कल्चर आणि नाट्य संस्कृतीची भूरळ

वडील दशरथ, आई शांताबाई आणि चार बहीण व तीन भाऊ यामध्ये सहावा मुलगा म्हणजे प्रियपाल. गावात चौथीपर्यंत शाळा असल्याने शिक्षणासाठी गाव बदलत राहणारा आणि गावातल्या गावात लोकांना हासवून विरंगुळा म्हणून गाणारा हा मुलगा पुढे एक हुन्नरी नट होईल, याची कल्पना कुणीच केली नसेल. बारावीत शिकत असताना प्रियपालचा मोठा भाऊ नितीन हा पुण्यात उच्च शिक्षण घेत होता. पुण्यातील कल्चर आणि नाट्य संस्कृतीची त्याला भूरळ पडली आणि त्यांनी प्रियपालला 'ललित कला केंद्रात' नाट्य शिक्षणासाठी प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले.

डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा बाबासाहेब म्हणणारं पात्र

 प्रियपालचाही कलेत रस असल्याने त्याला तिथे प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यानी  प्रसिद्ध अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस् मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. मात्र, एवढं करूनही त्याच्यासाठी हे सर्व सोपं नव्हतं. प्रत्येक जागी ‘नॉट फिट’ ऐकूनही तो खचला नाही. अभिनेत्यासोबतच एक सुंदर गायक असल्याने तो मुंबई सारख्या शहरात पोट भरण्यास सक्षम होताच. दोन-तीन वर्षाच्या प्रयत्नाने अखेर तो नजरेत आलाच आणि त्याने पहिली मालिका म्हणजेच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरव गाथा’ मिळविली. त्यानंतर तो घरा घरात पोचला. या मालिकेत तो ‘दामू’ ची भूमिका साकरतो आहे. डॉ. भीमराव आंबेडकरांना पहिल्यांदा बाबासाहेब म्हणणारं हे महत्वाचं पात्र तो करतो आहे. 

मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकेतही दिसणार

या आधी त्याने मराठी चित्रपटांमध्ये लहान-सहान भूमिका केल्या आहेत. येणाऱ्या काळात प्रियपाल हा महत्वाच्या भूमिकेत मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकेतही दिसणार आहे. एवढंच नाही तर जगभरात आपल्या रॅप साँगने फेमस असणाऱ्या ‘डिवाईन’ सोबतही तो एका गाण्यात झळकणार आहे. या सगळ्याचं श्रेय तो त्याच्या आई-बाबांना देतो. कारण त्यांना शिक्षणाचं महत्व कळलं म्हणून तो एवढं शिक्षण घेऊ शकला. आता तो शेत मजुरी ते सिने हाजरी ह्या प्रवासात तो रोज नव्या उंची गाठत आहे.

नाटकापेक्षा चित्रपटातील अभिनय अवघड

अभिनायचं प्रशिक्षण पाच वर्ष ललित कला केंद्र पुणे, विद्यापीठात आणि मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर कामाचा शोध सुरु झाला. वेगवेगळ्या भूमिका करताना खुप आनंद मिळतो. परंतु, या क्षेत्रात खूपच जास्त संघर्ष असतो. पहिल्या दिवशीचा अनुभव फारच छान होता. अजुबाजुला जी माणसं बघतो ती भूमिकेशी जोडावी लागतात. नाटकापेक्षा चित्रपटातील अभिनय अवघड आहे. तिकडे जास्त कस लागतो.
-प्रियपाल गावकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com