औरंगाबादच्या मिनी घाटी महिनाभरात सुरू करू: डॉ. दीपक सावंत

योगेश पायघन 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

राजकीय पेच सुटेना..
ज्या भागात ही इमारत बांधण्यात आली तेथील आमदार विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष तर खासदार हे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तर हे रुग्णालय शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य खात्याकडे आहे. राजकीय पेचही यामागे असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याचा आरोग्य मंत्री यांचा मनोदय असल्याचेही बोलले जाते मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याची तूर्तास शक्यता नाही. तर हाफकीन कडून अनेक यंत्रसामुग्री व औषधींनाचाही पुरवठा नसल्याने सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ओपीडीलाही औषधे पुरत नसल्याची परिस्थिती असल्याने औषधी तुटवड्यात रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणेही शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे.

औरंगाबाद : येत्या महिनाभरात जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सुरू करू. त्याआधी राज्यातील औषधी पुरावठा सुरळीत करायचा आहे. हाफकीनकडून निविदा निघाल्या आता 15 ते 20 दिवसात पुरवठा होईल. व औषध कोंडी फुटेल. औरंगाबाद जिल्ह्यातही मोफत किमोथेरपी योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याने दोन्ही सोबतच सुरू करू असे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मिनी घाटीची पाहणी करतांना ते पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या दोन वर्षांपासून चिकलठाणा येथील 38 कोटी खर्चून उभारलेले दोनशे खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी)उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याची आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी पाहणी केली.

यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, अंबादास दानवे, ऍड अशोक पटवर्धन, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी उदय चौधरी, आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ विवेक खतगावकर, प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, सहाय्यक संचालक डॉ सुनीता गोलाईत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या रुग्णालयाच्या उद्घाटना संदर्भात आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव डॉ व्यास यांनी मंगळवारी (ता 14) पाहणी केली होती. मात्र, रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नव्हती. स्वातंत्र्यदिनी गुपचूप उद्घाटन उरकण्याचा घाट आरोग्य विभागाने घातला होता. त्यासाठी बुधवारी (ता 15) रुग्णालयाची अंतर्गत सुरेख सजावट करण्यात आली होती. मात्र, विमानतळासह महापालिकेच्या अग्निशमन विभागाने रुग्णालयाला नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. विविध शासकीय कार्यालयांची एनओसी मिळाल्याशिवाय कोणत्याही विकासकामाचे लोकार्पण करू नये, असे संकेत असल्याने हे उदघाटन होऊ शकले नाही. बुधवारी सकाळी ध्वजवंदन जुन्या कार्यालयात झाल्याने उदघाटनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले होते. 

मागील दोन वर्षांपासून अनेक वादात ही इमारत सापडली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे पालकमंत्री डॉ सावंत यांच्या डेडलाईनने सुद्धा रुग्णालय सुरू होऊ शकले नाही. शिवाय पाण्याची पुरेशी व्यवस्था अद्याप होऊ शकली नाही 87 लाखाची नवीन पाईप लाईनचे काम महापालिका सुरू करू शकली नाही. 

राजकीय पेच सुटेना..
ज्या भागात ही इमारत बांधण्यात आली तेथील आमदार विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष तर खासदार हे भाजपाचे राज्याचे अध्यक्ष आहेत तर हे रुग्णालय शिवसेनेकडे असलेल्या आरोग्य खात्याकडे आहे. राजकीय पेचही यामागे असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री व शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा करण्याचा आरोग्य मंत्री यांचा मनोदय असल्याचेही बोलले जाते मात्र सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याची तूर्तास शक्यता नाही. तर हाफकीन कडून अनेक यंत्रसामुग्री व औषधींनाचाही पुरवठा नसल्याने सध्या सुरू असलेल्या दररोजच्या ओपीडीलाही औषधे पुरत नसल्याची परिस्थिती असल्याने औषधी तुटवड्यात रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करणेही शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे.

Web Title: Dr. Deepak Sawant visit Ghati Hospital in Aurangabad