डॉ. प्रियंका रेड्डीप्रकरणी नांदेडात महिलांचा एल्गार

शिवचरण वावळे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

- डॉ. प्रियंका रेड्डी हत्येविरोधात मानवी साखळी
- नांदेडला महिला, तरुणींनी एकत्र येऊन केला निषेध
- काळ्या फिती, काळे वस्त्र परिधान करुन निषेध व्यक्त
- महात्मा फुले पुतळा, जुना मोंढा येथे मानवी साखळी 
- शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग

 नांदेड-  डाॅ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अमानवीय अत्याच्यार व हत्येविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुधवारी (ता. चार) नांदेड शहरात डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावरील अमानुष अत्याचार व हत्त्येच्या विरोधात सर्वपक्षीय निषेध व मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला, तरुणी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी सर्वांनी डॉ. प्रियंका रेड्डी यांच्या हत्येचा निषेध व्यक्त करत आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

 

मानवतेला कलंक लावणारी घटना घडल्याने या विरोधात नागरिकांना संताप व्यक्त केला. रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्वांनी काळे वस्त्र परिधान केले होते तसेच तोंडावर काळ्या रंगाची पट्टी बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. तरुणी व महिलांसह विविध संस्था, संघटना आणि पक्षांचे पदाधिकारी तसेच नागरिकही सहभागी झाले होते.  

 

दोन ठिकाणी मानवी साखळी

बुधवारी सकाळी अकरा वाजता आयटीआय येथील महात्मा फुले पुतळा येथे सर्वजण उपस्थित झाले. यावेळी डॉ. प्रियंका रेड्डी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मानवी साखळीस सुरूवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी निषेधाच्या घोषणा देत आपला सहभाग नोंदवला. आयटीआय ते महात्मा फुले कार्यालयापर्यंत मानवी साखळी करण्यात आली. त्याचबरोबर जुना मोंढा येथेही महिला व तरुणींनी एकत्र येत मानवी साखळी करुन निषेध व्यक्त केला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सर्वांनी मिळून निषेधाचे निवेदन देण्यात आले.

अनेकांचा सहभाग

‘सकाळ’ माध्यम समुहाच्या ‘तनिष्का’ आणि ‘मधुरांगण’ च्या वतीने महिला सदस्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी दैनिक ‘सकाळ’चे सहयोगी संपादक दयानंद माने, ‘मधुरांगण’च्या समन्वयिका स्वाती देशपांडे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. या मानवी साखळीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. शोभा वाघमारे, राजश्री पाटील, नगरसेविका जयश्री पावडे, कृष्णा मंगनाळे, कल्पना डोंगळीकर, सुरेखा पाटणी, ॲड दीपा बियाणी, धनश्री देव, संध्या माहेश्वरी, अंजली जोशी, डॉ. विभा भालेराव, अंजली देशमुख, शर्वरी सकळकळे, किर्ती तगडपल्लेवार, जयश्री जयस्वाल, महादेवी मठपती, विद्या आळणे, पुष्पा कोकीळ, प्रा. सुरेखा किनवगावकर, डॉ शीतल भालके वैद्य, डॉ. लक्ष्मी पुरणशेट्टीवार, लता बंदमवार, प्रा. सारिका बच्चेवार, संगिता बियाणी, निकिता शहापूरवाड, प्रा. झाडबुके, डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर, अरुंधती पुरंदरे, प्रविण साले, नवल पोकर्णा आदींनी सहभाग नोंदविला. 

दामिनी ग्रुपची स्थापना

नांदेडमध्ये शाळकरी, महाविद्यालयीन मुली, तरुणी तसेच महिला यांची छेड काढणे, अत्याचार करणे यासारख्या घटना वाढत आहेत. या विरोधात आपणही आवाज उठवला पाहिजे, या साठी विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन दामिनी ग्रुपची स्थापना केली आहे. हा ग्रुप नांदेड तसेच परिसरातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात काम करणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Elgar of women in Nanded for Priyanka Reddy