डॉ. मुंडेच्या पापाचा असा भरला घडा 

munde couple
munde couple

परळी (जि. बीड) - वैद्यकीय पेशा असला तरी राजकीय मंडळींत उठबस करणाऱ्या येथील डॉ. सुदाम मुंडे याच्या पापाचा घडा भोपा (ता. धारूर) येथील विजयमाला पटेकर हिच्या मृत्युमुळे भरला.

 बेकायदा गर्भलिंगनिदान करून गर्भपात करताना 18 मे 2012 ला विजयमालाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिनाभर फरारी असलेला डॉ. मुंडे व त्याची पत्नी डॉ. सरस्वती पोलिसांना शरण आले. तेव्हापासून दोघेही कोठडीची हवा खात होते. आता त्यांना पुन्हा दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे. परळीतील उच्चशिक्षित असलेले हे डॉक्‍टर दांपत्य आर्थिकदृष्ट्याही सक्षम होते. पत्नी डॉ. सरस्वती स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. सुदाम स्त्रीरोग आणि अस्थिरोग शल्यचिकित्सक असा दुहेरी पदविधारक होता. परळीतील मोजक्‍या स्त्रीरोग तज्ज्ञांपैकी असल्याने या दांपत्याचा वैद्यकीय व्यवसायही जोरात होता. त्यातच बसस्थानकासमोर असल्याने त्याचे रुग्णालय गजबजलेले असायचे. यातून मिळणाऱ्या पैशांवर समाधानी नसलेल्या या दांपत्याने पेशाला काळीमा फासायला सुरवात केली आणि बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात सुरू केले. परळीतील मोजक्‍या आर्थिक सक्षम व्यक्तींपैकी एक असल्याने त्याची राजकीय उठबसही होतीच. याचाच गैरफायदा घेत त्याने महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा आपल्या खिशात असल्याचा आविर्भाव आणला आणि आपल्या या कृत्याचा फैलाव वाढविला. परळीतील सिमेंट कारखान्यातील वाहतूक, औष्णिक वीज केंद्राच्या राखेच्या वाहतूक व्यवसायात त्याच्या मुलाची बड्या राजकीय मंडळींसोबत भागीदारी होती. सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना पुढच्या खुर्चीवर बसणारा सुदाम मुंडे इकडे रुग्णालयात राजरोस बेकायदा गर्भातील कळ्या खुडत असे. गर्भपात केलेले अर्भक शेतातल्या विहिरीत आणि कुत्र्यांना खाऊ घातल्याचा आरोपही त्याच्यावर झाला. मात्र, त्याचा पुरावा आढळला नसला तरी त्याने या गर्भांची नेमकी विल्हेवाट कशी लावली, हेही समोर आले नाही. 
 
अखेर घ्यावी लागली दखल 
डॉ. सुदाम मुंडे हा राजरोस बेकायदा गर्भलिंगनिदान, गर्भपात करी. मात्र, त्याने निर्णाण केलेल्या दबावामुळे कुठलीही यंत्रणा डोळेझाक करी. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याच्यावर थेट आरोप करूनही कुठलीच यंत्रणा दखल घेत नसे. मात्र, त्याने 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव 
पटेकर (रा. भोपा, ता. धारूर) या ऊसतोड मजूर महिलेचा बेकायदा गर्भपात केला. यातच तिचा मृत्यू झाला आणि डॉ. मुंडेच्या पापाचा घडा भरला. 
 
परवान्यापेक्षा जास्त खाटा 
डॉ. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयाला आरोग्य विभागाने 10 खाटांची मान्यता दिली होती. विजयमाला पटेकर मृत्यू प्रकरणानंतर आरोग्य आणि महसूल पथकाने केलेल्या पाहणीत 64 खोल्यांच्या रुग्णालयात 117 खाटा आढळल्या. 
 
तीन राज्यांत कनेक्‍शन 
डॉ. सरस्वती व डॉ. सुदाम मुंडे हे स्त्रीरोग तज्ज्ञ असले तरी इथे स्त्री रुग्णांवरील उपचार कधी झालेच नाहीत. गर्भलिंगनिदान, गर्भपात यासाठीच हे रुग्णालय कुप्रसिद्ध होते. राज्यातील विविध भागांसह शेजारच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लोक येथे येत असत. त्यामुळे अक्षरशः या रुग्णालयात नेहमीच जत्रा भरलेली असायची. या प्रकरणात जळगाव येथील डॉ. राहुल कोल्हेसह 10 जणांना अटक झाल्यावरून याला दुजोराच मिळाला. 
 
फरारी आणि कारागृहात 
18 मे 2018 रोजी विजयमाला पटेकर हिच्या मृत्यूनंतरही पोलिसांशी लागेबांधे असल्याने डॉ. सुदाम मुंडे याच्यावर किरकोळ कलमे लागली. मात्र, हे प्रकरण राज्यभर गाजल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला. मात्र, सुदाम तब्बल 26 दिवस फरारी होता. फरारी घोषित करून महसूल प्रशासनाने 
त्याच्या संपत्तीची माहिती मागविली आणि तो हजर झाला नाही तर ती शासनाकडे जमा करण्याची तंबी दिली. त्याच्यासह त्याचा मुलगा पापा मुंडे याचे बॅंक खाते गोठविण्यात आले. मुंडे दांपत्याकडे तब्बल 160 एकर जमीन, दोन प्लॉट असे घबाड असल्याचे उघड झाले. यामुळे तो 17 जूनला पोलिसांसमोर हजर झाला; तेव्हापासून कारागृहात असलेल्या डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे यांना यापूर्वी चार वर्षांची, तर शुक्रवारी (ता. आठ) पुन्हा एकदा 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली गेली आहे. 

दोघांची आत्महत्या, एकाचा मृत्यू 
डॉ. सुदाम मुंडे याच्या प्रकरणाशी संबंधित एकाचा मृत्यू तर दोघांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणातील साक्षीदारांची फितुरी व आत्महत्या यांचा जवळचा संबंध असल्याचा संशय आहे. मुंडेच्या रुग्णालयातील नर्स व त्याचा कारभार पाहणारा डॉ. केंद्रे या दोघांनी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या दोन्ही आत्महत्यांची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. डॉ. मुंडेच्या रुग्णालयावर वर्ष 2005 मध्ये आरोग्य व महसूल यंत्रणेने छापा टाकून गर्भलिंग निदान होत असल्याचे उघड केले. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू असताना डॉ. मुंडे असे कृत्य पुन्हा पुन्हा करत होता. विजयमाला पटेकर हिच्या मृत्युप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला. हे प्रकरण अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात गेले. तीन साक्षीदार तपासल्यानंतर हे प्रकरण बीडच्या न्यायालयात हलविण्यात आले. त्या वेळी न्यायालयीन कोठडीत असलेला डॉ. सुदाम मुंडे, त्याची बाहेरची यंत्रणा या माध्यमातून तो दबावासाठी सूत्रे हलवायचा. या प्रकरणातील साक्षीदारच सुरक्षित नसल्याचे दोन आत्महत्यांवरून स्पष्ट झाले होते. या प्रकरणात साक्षी नोंदविलेले साक्षीदार एकेक करून फितूर होत गेले. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयात काम करणारे आणि या प्रकरणात साक्षीदार असणारे आता पूर्वीच्या ठिकाणी आढळत नाहीत. यातील बहुतेकांनी परळी सोडली आहे.  

दोन वर्षांत चार हजार विक्रीडिलचा वापर

गर्भपातासाठी लागणाऱ्या विक्रीडिल या औषधींच्या व्हाईल्सची जेवढी जिल्ह्यात मागणी आणि विक्री असे, त्यातली 70 टक्के मागणी आणि उपयोग एकट्या डॉ. सुदाम मुंडेच्या रुग्णालयात होई. यावरून त्याचे रुग्णालय गर्भपातासाठी किती कुप्रसिद्ध होते, हे लक्षात येते. वर्ष 2010 ते 2012 या कालावधीत त्याच्या रुग्णालयात तब्बल तीन हजार 940 एवढ्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या विक्रीडिल या औषधींचा वापर झाला. विशेष म्हणजे यातील एक वर्ष त्याच्या गर्भपात केंद्राचा परवाना रद्द होता. मुंडे दांपत्याच्या परळी येथील रुग्णालयात बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याचे 19 सप्टेंबर 2010 मध्ये स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर झाले. यानंतर त्याच्या रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्राची परवानगी रद्द करण्यात आली. मात्र, परळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञ दिवंगत डॉ. अनंत गित्ते यांचे शपथपत्र वापरून तो सोनोग्राफीच्या माध्यमातून बिनबोभाट सोनोग्राफी करत असे. दरम्यान, त्याच्या गर्भपात केंद्रातील अनियमिततेवरून त्याला बजावलेल्या नोटिसीला त्याने उत्तरच न दिल्याने 15 मे 2011 पासून त्याच्या गर्भपात केंद्राचा परवानाही रद्द करण्यात आला. यानंतर 17 मे 2012 रोजी विजयमाला पटेकर हिच्या मृत्यूनंतर त्याच्या रुग्णालयात गर्भपाताच्या किती किट वापरल्या, याची औषधी प्रशासनाने तपासणी केल्यानंतर अचंबित करणारी आकडेवारी समोर आली. अख्ख्या जिल्ह्यात लागणाऱ्या गर्भपाताच्या औषधींपैकी 70 टक्के औषधी त्याच्या रुग्णालयात वापरली जात होती.  त्याच्या रुग्णालयातील गणेश मेडिकल या दुकानावरून दोन वर्षांत तीन हजार 940 एवढी विक्रीडिल या औषधींची विक्री झाल्याचा अहवाल तत्कालीन सहायक औषधी आयुक्त कि. गो. चांडक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. 


सुदाम मुंडेला शिक्षा होणे ही चांगली बाब असली तरी असे प्रकार सरकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा हप्तेखोरीशिवाय होऊ शकत नाहीत. त्यामुळे न्यायालयात सिद्ध झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हायला हवी.'' 
- महेश झगडे, तत्कालीन अन्न व औषध प्रशासन आयुक्त. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com