भर पावसाळ्यात होणार नालेसफाई!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जून 2019

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिकेतर्फे नालेसफाईची कामे केली जातात. यंदा मात्र महापालिकेने निविदाच विलंबाने काढली आहे. शहर परिसरात ११८ पेक्षा अधिक नाले आहेत. त्यांची लांबी शंभर ते सव्वाशे किलोमीटर आहे. मोठे पाऊस होताच नाले तुंबून नागरिकांच्या घरांत पाणी शिरते. गतवर्षी अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे यंदा नालेसफाईची कामे होणे गरजेचे होते; मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.

औरंगाबाद - महापालिकेचे काम ‘वरातीमागून घोडे’ अशाच पद्धतीने सुरू आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना अद्याप नालेसफाईची निविदा अंतिम झालेली नाही. त्यामुळे नालेसफाईची कामे सुरू होईपर्यंत पावसाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वी एखादा मोठा पाऊस झाल्यास नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी घुसण्याचा धोका आहे. 

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी महापालिकेतर्फे नालेसफाईची कामे केली जातात. यंदा मात्र महापालिकेने निविदाच विलंबाने काढली आहे. शहर परिसरात ११८ पेक्षा अधिक नाले आहेत. त्यांची लांबी शंभर ते सव्वाशे किलोमीटर आहे. मोठे पाऊस होताच नाले तुंबून नागरिकांच्या घरांत पाणी शिरते. गतवर्षी अनेकांचे बळी गेले होते. त्यामुळे यंदा नालेसफाईची कामे होणे गरजेचे होते; मात्र अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. 

नालेसफाईसाठी यंत्रे भाड्याने घेण्यासाठी महापालिकेने निविदा काढली होती. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. दरम्यान, मजुरांमार्फत नाल्यांची सफाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला तीन लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यानुसार आतापर्यंत पन्नासहून अधिक नाल्यांची सफाई झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जेसीबी, पोकलेन अशा यंत्रांअभावी मोठ्या नाल्यांची सफाई होऊ शकली नाही. त्यामुळे एखादा मोठा पाऊस झाल्यास नाल्याच्या काठावर असलेल्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dranage Cleaning in Rainy Season