वयाच्या ५७ व्या वर्षी पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न केले पूर्ण, कुठे ते वाचा ?

पंजाब नवघरे
Sunday, 30 August 2020

एका पोलिस कर्मचाऱ्यांने  सेवानिवृत्तीला तीन दिवस बाकी असताना वयाच्या ५७ व्या वर्षी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

वसमत (जिल्हा हिंगोली)  : प्रत्येकाला मोठे अधिकारी व्हावे असे वाटते. मात्र अनेक प्रयत्न करूनही अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही. परंतु, एका पोलिस कर्मचाऱ्यांने  सेवानिवृत्तीला तीन दिवस बाकी असताना वयाच्या ५७ व्या वर्षी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

शंकर इंगोले असे पोलिस अधिकारी बनलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. श्री. इंगोले हे सध्या कुरुंदा (ता वसमत) पोलिस ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा जन्म पिंपळा चौरे (ता वसमत) येथे शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आई वडील, पाच भावासह कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर होता. त्यामुळे मिळेल ती  नोकरी करणे महत्वाचे होते. यातूनच ते १९८७ साली पोलिस दलात भरती झाले.  त्यांनी आपल्या ३३ वर्षाच्या सेवेत जालना, परभणी, औंढा, आखाडा बाळापूर, हट्टा, कुरुंदा पोलिस ठाण्यात सेवा बजावली.  या काळात कामकाजात वेगळा ठसा निर्माण केला. 

हेही वाचा  राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द- जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

निःशस्त्र पोलिस उपनिरीक्षक पदी  पदोन्नती

मात्र सेवा बजावत असताना अधिकारी होण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. त्यांनी पोलिस अधिकारी होण्यासाठी लागणारी विभागीय अर्हता परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. यात ते उत्तीर्ण झाले. शासनाने  राज्यातील  विभागीय अर्हता परीक्षा २०१३ मधील उत्तीर्ण अंमलदारापैकी पात्र अमलदारांना सेवाज्येष्ठता नुसार पोलिस उपनिरीक्षक २५ टक्के कोट्यातील रिक्त जागी पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार  आरक्षण नसलेल्या, खुल्या प्रवर्गातुन भरती झालेले व इतर मागास प्रवर्गातून भरती झालेल्या, जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेल्या राज्यातील आठ पोलिस अमलदारांना निःशस्त्र पोलिस उपनिरीक्षक पदी  पदोन्नती दिली आहे  तसे आदेश राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी आदेश काढले आहेत. यात श्री इंगोले यांचा समावेश आहे. शनिवारी ते नांदेड परिक्षेत्रात रुजू झाले आहेत. मात्र ते ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 

येथे क्लिक करा -  हिंगोली : मेथा येथील गजानन जागृत देवस्थान भाविकांचे श्रद्धास्थान

पोलिस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण

त्यामुळे त्यांना केवळ तीन दिवसच काम करण्याची संधी मिळणार आहे.  काम करण्याची अल्प संधी मिळणार असली तरी पोलिस अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान, सेवानिवृत्त नंतर सामाजिक, शेती क्षेत्रात काम करण्याचा संकल्प केला असून युवक, खेळाडूंना मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले.

खेळाडू म्हणून नावलौकिक

श्री इंगोले हे कब्बडीपटू आहेत. खात्यांतर्गत घेण्यात येणाऱ्या  क्रीडा स्पर्धेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream of becoming a police officer at the age of 57 is fulfilled, where to read it hingoli news