राजेंद्र देशमुख यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द- जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश 

पंजाब नवघरे
Saturday, 29 August 2020

आंबा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडूण आलेले राजेंद्र देशमुख यांची जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द

वसमत (जिल्हा परभणी) : जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीमध्ये सादर न केल्याचा ठपका ठेवत आंबा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडूण आलेले राजेंद्र देशमुख यांची जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड रद्द करून त्यांना सदस्य म्हणून राहण्यास अनर्ह ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीमध्ये आंबा जिल्हा परिषद गटाची निवडणूक प्रक्रिया पार पडली.  सदर गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव होता. या गटातून  राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र  देशमुख रा. सेलू यांनी आंबा येथील शिल्पा श्रीनिवास भोसले यांचा पराभव करून विजय मिळविला होता. दरम्यान, राजेंद्र देशमुख यांचे जात प्रमाणपत्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढलेले असून त्यांच्याकडे जातीचे ठोस पुरावे नसल्याची लेखी तक्रार शिल्पा श्रीनिवास भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. 

हेही वाचा  हट्टा पोलिसांनी दहा लाखाच्या कंटेनरसह १८ लाखाचा गुटखा पकडला

राजेंद्र देशमुख यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द

दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते नदाफ म. बशीर खान यांनीही जिल्हा परिषद सदस्य देशमुख यांची निवड रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणी नदाफ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याप्रकरणात जवळपास चार वेळा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली. परंतु, वारंवार गैरअर्जदार देशमुख यांनी मुदत वाढवून मागितली. याप्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्याकडून २१ आॅगस्ट २०१८ रोजी राजेंद्र देशमुख यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरवून रद्द करण्याचे आदेश पारीत केले होते. या निर्णयावर देशमुख यांनी चार आॅक्टोंबर २०१८ रोजी उच्च न्यायालयात धाव घेत रिट याचिका दाखल केली होती. परंतु, आजपर्यंत सदर प्रकरणी उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, हिंगोली यांच्या आदेशास स्थगिती दिली नाही. त्यामुळे अर्जदार बशीर खान यांचा अर्ज मान्य करून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी संबंधीत प्रकरणातील गैरअर्जदार राजेंद्र मोहनराव देशमुख यांची आंबा गट क्रमांक ४४ मधून जि. प. सदस्य म्हणून झालेली निवड महाराष्ट्र जि. प., पं. स., अधिनियम १९६१ चे कलम १२ क अन्यये रद्द करण्याचे आदेश पारित केले. 

याप्रकरणी हायकोर्टात रीट याचिका दाखल केलेली असल्याने आता देशमुख यांच्याकडे न्यायालयात जाण्याचा आणि आयुक्तांकडे जाण्याचा मार्गही खडतर आहे. 

येथे क्लिक करा -  सुशिक्षीत बेरोजगारांसाठी ऑनलाईन पंडित दिनदयाळ उपाध्याय, रोजगार मेळाव्याचे आयोजन

मतदार व शासनाची फसवणूक करून जातीचे ठोस पुरावे नसताना राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे सदस्यत्व रद्द होणे म्हणजे हा लोकशाहीचा विजय आहे़ याप्रकरणात वर्षभरातच निकाल लागणे अपेक्षीत होते़ परंतु, पैशाचा जोरावर तो आजपर्यंत रेटून नेण्यात संबंधीतांना यश आले़ परंतु, शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि तो आज झाला़ यापुढेही लोकहितासाठी आमचा लढा सुरूच राहील.

 शिल्पा भोसले ( प्रतिस्पर्धी उमेदवार ) : 

मी औरंगाबाद हायकोर्ट याचिका दाखल केलेली असून त्याचा निकाल ३१ ऑगस्टला आहे त्यानंतर मी माझी प्रतिक्रिया आपणास देतो असे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले. 

राजेंद्र देशमुख ,(जिल्हा परिषद सदस्य )

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Deshmukh's Zilla Parishad membership canceled- Order issued by the District Collector hingoli news