दुष्काळाचा तेरावा महिना...

Aurangabad
Aurangabad

औरंगाबाद हे शिल्पकलेसाठी जगप्रसिद्ध शहर. इथल्या शिल्पाविषयी लोकांना जितकी भुरळ आहे; तितकेच वाईट सतत पडणाऱ्या दुष्काळाविषयी वाटते... इतके भयाण चित्र सध्या येथे आहे... पाणी नाही. त्याचा थेट परिणाम उद्योगधंद्यावर झाला... आणि मग उद्योगावर ज्याचे पोटपाणी चालते, त्यांनी मुंबई-पुण्याचा रस्ता धरलाय. शहरात कसेबसे हाताला काम मिळते. ग्रामीण भागात उद्योगावर आलेल्या टाचेमुळे दोन वेळा पेटणाऱ्या चुलीवरच गंडांतर आले आहे.

शहरापासून २५ किलोमीटर अंतरावरच्या आंबेलोहळ नावाच्या गावात मी पोहचलो. सकाळी १०-११ची वेळ असेल. एवढ्या सकाळीही गावात शुकशुकाट होता. गावात ‘राजे शहाजी ज्युनिअर कॉलेज’ असा बोर्ड वाचून मी आत शिरलो. एक शिक्षक बाहेर खुर्ची टाकून बसले होते. त्यांना भेटल्यावर कळले, की चांगदेव पवार हे या कॉलेजचे प्राचार्य आहेत. मुले कॉलेजमध्ये येतील, या आशेवर प्राचार्य कॉलेजबाहेर खुर्ची टाकून बसले होते. पण, सहाशेमधून केवळ जेमतेम दहा-पंधरा मुले कॉलेजात होती... माहिती घेतल्यानंतर कळले, की या भागातली सर्व मुले वेगवेगळ्या कंपन्योत काम करतात, शेतात मजुरी करतात. या भागात असणाऱ्या अनेक कंपन्यांना कुलूप लागले आहे. शेतीला पाणी नाही म्हणून शेतीतून मिळणारा रोजगार कमी झाला.

परिणामी, रिकाम्या हातांची संख्या वाढत गेली. ज्या कंपन्या सुरू आहेत, जिथे शेतीसाठी कामगार लागतात, त्यांनी रोजंदारीचे दर खूप कमी केले. पूर्वी जिथे एक कमावणारा माणूस अवघे कुटुंब चालवायचा, तिथे आता मुलांसह सगळ्यांना काम करावे लागते. मुलांच्या कष्टातून दोन वेळची चूल पेटण्यास मदत होते. मग ज्या हातात पेन आणि पुस्तक यायला पाहिजे, तिथे कुदळ आणि फावडे घ्यावे लागते. प्राचार्य आपल्या काही सहकारी प्राध्यापकांसोबत सेवा देण्याची भूमिका बजावतात. अधूनमधून येणारी मुले एकदम हुशार. मागचा निकाल पंच्याण्णव टक्के लागला; पण कॉलेजला अनुदान नाही.

त्यामुळे संस्थाचालकांच्या खिशातून प्राध्यापकांचे पगार होतात... बिचारे प्राध्यापक ‘कॉलेजला अनुदान मिळणार आहे’ असा जीआर कधी मिळेल, याची वाट पाहतात. संस्थाचालक गणेश बनकर हे गावातले तरुण. ते अवघे तीस वर्षांचे. आपल्या गावासह परिसरातील दहा गावांतील मुले ६ वी-७ वीनंतर पुढे शिकतच नाहीत, हे लक्षात आल्यावर त्यांनी हे कॉलेज काढले.

पण, आज अनुदान नसल्यामुळे कॉलेजचे पुढे काय होईल, ही एक मोठी चिंता त्यांना सतावत आहे. मलकापूरचा बजरंग राजपूत हा या कॉलेजात शिकतो. रोज त्याला या कॉलेजला येण्यासाठी पाच किलोमीटर पायी यावे लागते. बजरंग यांच्या गावात रस्ता नसल्यामुळे गावात ना एसटी येत; ना खासगी वाहन. बजरंग सांगत होता, घरी गेल्यावर आपला वेळ पाणी भरण्यासाठी जातो. तस्लीम पठाण ही अकरावीला असणारी युवती एका खासगी ठिकाणी काम करते. कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून ती शिकते. वडील नाहीत, असे म्हणत दुःख करीत बसणे आवडत नाही, असे ती म्हणते. माझ्यासारख्या गरीब मुलीला शिक्षण घेणे परवडत नाही, असे ती सांगत होती.

आंबेलोहळला जात असताना अनेक शक्तिप्रदर्शन करणाऱ्या रॅली निघाल्या होत्या. पण, या गावात निवडणुकीची धामधूम अजिबात नव्हती. आंबेलोहळ गावात ‘भागवत सप्ताह’ सुरू होता. भागवत ग्रंथाची गावात दिंडी निघाली होती. मी काही युवकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक उत्तरामध्ये शासनाची फसवेगिरी जाणवत होती. उमेश प्रधान यांच्याकडे दहा एकर शेती. आपल्या शेतीजवळ बंधारा होतोय, या आशेवर त्यांनी चार दुभती जनावरे घेतली. गावातल्या गावात दुधाचा व्यवसाय सुरू केला. पुढे बंधारा झाला नाही. उमेश यांनी व्यवसाय बंद केला. आता गावात बाहेरून पिशवीतील दूध येते. आपल्या गावात जो उमेश चार पैसे कमवायचा, आता त्याला औरंगाबादला जाऊन तुटपुंज्या पैशावर काम करावे लागते. गावात पाच वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीचे उद्‌घाटन झाले. पण, अजून नव्या टाकीतून गावकऱ्यापर्यंत पाणी आलेच नाही. कित्येक वेळा तक्रारी केल्या. पण, टाकीच्या कामाचे भिजत घोंगडे कायम आहे... 

औरंगाबादमधल्या एका आंबेलोहळचीच ही अवस्था नाही, तर जिल्ह्यात सगळीकडे दुष्काळातला तेरावा महिना अनुभवायला मिळतो...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com