परतीच्या पावसाचीही आशा धूसर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

निलंगा तालुक्‍यातील प्रकल्प कोरडेठाक, रब्बीही हाती न लागण्याची शक्‍यता 

निलंगा(जि. लातूर)  : यंदा ऐन पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे परतीच्या पावसाचीही आशा धूसर झाली आहे. तालुक्‍यातील विविध प्रकल्प कोरडेठाक असून, पाऊस नसल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलाच आहे; पण रब्बीचा हंगामही हाती न लागण्याची शक्‍यता आहे. 

यंदा तालुक्‍यातील काही भागांत वेळेवर पाऊस झाल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांच्या पेरण्या मृग नक्षत्रात झाल्या, तर काही भागांत उशिरा पाऊस झाल्यामुळे तब्बल दीड महिन्यानंतर खरीप हंगामाच्या पेरण्या झालेल्या आहेत. प्रारंभी पेरण्या झालेल्या पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आजपर्यंत एकही पाऊस मोठा झाला नसल्यामुळे पाण्याची स्थिती गंभीर असून आजही काही गावांत नागरिकांना अधिग्रहणांचा आधार आहे.

पावसाळा संपत आला असून पावसाळ्याचे केवळ पंधरा दिवस उरले आहेत. त्यामुळे परतीचा पाऊस तरी चांगल्या प्रकारे होईल, अशी आशा प्रारंभी व्यक्त करण्यात येत होती; मात्र हा पाऊसही होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे अनेक वेळा कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्‍यात येत नसल्यामुळे शेतकरी निराश आहेत.

तालुक्‍यातील मांजरा आणि तेरणा या दोन्ही नद्या कोरड्याठाक असून बडूर मध्यम प्रकल्प, मसलगा मध्यम प्रकल्प यामध्ये पाणी नसल्यामुळे या प्रकल्पांवर अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. शिवाय केदारपूर, शेडोळ, नणंद, कासारशिरसी, नेलवाड आदी भागातील लघुप्रकल्पही कोरडेठाक आहेत. त्यामुळे भविष्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाऊस नसल्यामुळे सध्याचा खरीप हंगाम आणि भविष्यातील रब्बी हंगामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought condition in nilanga