आज काम, उद्याची नाय ग्यारंटी

आनंद इंदानी
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

बदनापूर तालुक्‍यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराचा प्रश्‍न भेडसावत आहे. सरकारने गावागावांत ‘मनरेगा’अंतर्गत कामे सुरू करून शेतकरी व शेतमजुरांना उपलब्ध करून द्यावीत.
- बाबासाहेब हिवराळे, ग्रामस्थ, धोपटेश्वर

बदनापूर (जि. जालना) - ‘दुष्काळामुळं कुठंबी कामधंदा मिळत न्हाई; पण पोट तर भरावं लागतं ना... म्हणून भर उन्हातबी आम्हासनी कमरेला दोरखंड बांधून विहिरीचा गाळ काढावा लागतोय. आज काम मिळालं, पण पुढं मिळंल की नाई ग्यारंटी राहिली न्हाई...’ अशी चित्तरकथा दुष्काळाच्या वणव्यात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या धोपटेश्वर (ता. बदनापूर) येथील चौघा तरुणांनी मांडली.

धोपटेश्वर येथील मिलिंद हिवराळे यांच्या शेतातील विहिरीचे सध्या गाळ काढण्याचे काम सुरू आहे. अर्थात, क्रेनने गाळ लवकर निघतो. मात्र, त्यास १० ते १२ हजार रुपयांचा खर्च येतो. सध्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरीही कफल्लक झाले आहेत; तेथे शेतमजुरांची काय कथा. मिलिंद हिवराळे यांनी दुष्काळी परिस्थितीत बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेल्या दीपक सुखदेव हिवराळे (वय २८), गणेश राहुल दाभाडे (वय २५), आनंद मंजितराव दुधाने (वय ३०) व कडुबा पांडुरंग खरात (वय ३५) या चौघा गरजवंत तरुणांना विहिरीचे गाळ काढण्याचे काम दिले. 

हाताला काम मिळाल्याने उन्हातही उत्साहात चौघे तरुण खडतर काम करीत आहेत. चौघांपैकी एकजण ७० फूट खोल विहिरीत उतरतो. पोहऱ्यात गाळ भरतो. तर, एक जण विहिरीवर उभा राहून चाकात दोरखंड अडकवतो, तर दोघे कमरेला दोरखंड बांधून पोहरा ओढत नेतात. अशा जिकिरीच्या कामातून त्यांचा तूर्त पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, चार दिवसांचे गाळ काढण्याचे काम संपल्यावर त्यांच्यापुढे पुन्हा रोजगाराचा यक्षप्रश्न उभा राहणार आहे. मजुरी करणाऱ्या दीपक हिवराळे याने दुष्काळाची भीषणता उलगडली. शिक्षण झाले नाही. कसण्यासाठी जमीनही नाही. त्यामुळे आम्हाला मिळेल ते काम करावे लागते. दुष्काळामुळे हाताला काम राहिले नाही. त्यामुळे आम्हाला सतत कामाचा शोध घ्यावा लागतो.

Web Title: Drought Employment Youth Well Work