दुष्काळाने शेतकरी कर्जाच्या कचाट्यात

घनसावंगी - ग्रामीण भागात सध्या गप्पांचा विषय यंदाचा दुष्काळ आहे, अशाच गप्पात मग्न ज्येष्ठ ग्रामस्थ.
घनसावंगी - ग्रामीण भागात सध्या गप्पांचा विषय यंदाचा दुष्काळ आहे, अशाच गप्पात मग्न ज्येष्ठ ग्रामस्थ.

घनसावंगी - नापिकी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना प्रकाशाच्या सणातही उदरनिर्वाहाच्या चिंतेने ग्रासले. यंदा हातात कापूस आला नाही, केलेला खर्चही वसूल झाला नाही, परिणामी यंदाही शेतकरी कर्जाच्या कचाट्यात सापडला आहे. 

गेल्या पावसाळ्यात पावसाचे अल्प प्रमाण राहिले, बदलते पर्जन्यमान, कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन घटले आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दरवर्षी बी-बियाणे, खते, पेरणी, कापणी, यासाठी ठरलेला खर्च करावा लागत आहे. त्यामुळे कापसाचे उत्पादनात खरीप हंगामाचे उत्पादन घटले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे एकरी दहा ते बारा क्विंटल उतारा येत होता, यावर्षी केवळ दोन ते तीनवर आला, अनेकांच्या हातात काहीही पडले नाही. परिणामी शेतकऱ्यांकडे जमापुंजी शिल्लक नाही. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांकडे जवळपास कापसाच्या गंजी लागलेल्या असायच्या, यंदा मात्र तुरळक कापसाच्या गंजी दिसत आहेत. विशेष म्हणजे घरात कापसाच्या गंजी असल्यामुळे फटाके वाजविण्यासाठी वडीलधाऱ्या मंडळींकडून चिमुकल्यांना मज्जाव होता. यंदा मात्र कापूसच नसल्याने फटाक्‍यांबाबत अनेकजण बिनघोर होते, अर्थात आर्थिक संकटाचा घोर मात्र कायमच होता. 

सर्वत्र दुष्काळी परिस्थिती, शेतीमाल नाही, सिंचनाएवढे पाणी नाही, जनावरांसाठी पिण्याचे पाणी नाही, शेतीमालाला भाव नाही, बहुतांश जलसाठ्यांनी तळ गाठला आहे,  मुक्‍या जनावरांना जगावयाचे तरी कसे हा प्रश्‍न शेतकऱ्यांची झोप उडवत आहे. जिथे थोड्याफार प्रमाणात सिंचन आहे तेथे महावितरणने भारनियमन करून नवे संकट निर्माण केले आहे. अशा अनेक संकटांनी शेतकऱ्यांना ग्रासले आहे. यात प्रशासकीय व शासकीय धोरण जेवढे कारणीभूत आहे, तेवढचे अस्मानी संकट जबाबदार असल्याचे शेतकरी गप्पांमध्ये बोलत आहे.

आठ महिन्यांचा प्रश्‍न
खरिपाच्या मालातून शेतकऱ्यांच्या हाती काही पडले नाही, रब्बीची पेरणीही नाही त्यामुळे शेती व्यवसाय धोक्‍यात आल्याने आगामी आठ महिने कसे काढायचे असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे, परिणामी शेतकरी कर्जाच्या चक्रात गुरफटत जात असून शेतकरी दुष्काळाच्या या खाईने आर्थिक अडचणीत लोटला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com