‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा 

‘तमाशाच्या पंढरी’तही दुष्काळाच्या झळा 

औरंगाबाद - यंदा संपूर्ण महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. कुठलेच क्षेत्र यातून सुटलेले नाही. ग्रामीण भागातील यात्रा आणि तमाशा ही महाराष्ट्राची ओळख. मात्र, दुष्काळाचा फटका गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांप्रमाणेच तमाशालाही बसल्याचे तमाशा कलावंतांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

दुष्काळामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या तमाशा फडमालकांना उतरत्या भावाने सुपाऱ्या ठरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिकिटावरील खेळ किंवा सुपारी घेऊन केलेले खेळ दोन्हीही तोट्यातच जात आहेत. यातून सर्व खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. 

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ‘तमाशाची पंढरी’ म्हणून ओळखले जाते. हुताशनी पौर्णिमा (होळी) होताच महाराष्ट्रातील सर्व तमाशांच्या राहुट्या येथे दाखल होतात. या राहुट्या म्हणजे तमाशा व्यावसायिकांची संपर्क कार्यालयेच असतात. राज्यातील विविध गावांतील यात्रा कमिट्या येथे सुपाऱ्या ठरविण्यासाठी येतात. यंदा तीव्र दुष्काळामुळे गावांतील यात्रा कमिट्यांकडून तमाशांना मिळणाऱ्या सुपाऱ्यांच्या बिदागीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  

तमाशा फड उभारणीसाठी मालकाला आधीपासून लाखो रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यासाठी तो ओळखीच्या लोकांकडून किंवा सावकाराकडून उचल घेतो. फडमालकाला हा तमाशाचा लवाजमा दोन महिने सांभाळावा लागतो. म्हणजे दरडोई सरासरी ३० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा दुष्काळामुळे यात्रांच्या वर्गणीत घट झाली आहे. परिणामी तमाशांच्या सुपाऱ्यांचे आकडेही उतरले आहेत. 

गोरगरीब जनता, शेतकरी हा तमाशाचा प्रेक्षकवर्ग आहे. राज्यभरात दुष्काळ पडल्यामुळे तमाशालाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक तमाशा मंडळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा कलावंतांसह शेतकरी वर्गाकडे लक्ष देऊन त्यांच्या दुष्काळाबाबतच्या मागण्या पूर्ण कराव्यात. 
- रघुवीर खेडकर, तमाशा कलावंत

तमाशा कलावंतांच्या अपेक्षा 
शासनाकडून मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी. 
‘म्हाडा’तर्फे कलाकारांना घरे बांधून मिळावीत. 
पठ्ठे बापूराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शासनाने पाच पुरस्कार द्यावेत. 
तमाशा वाहनांची टोलवसुली बंद करावी. 
अल्प व्याजदरात कर्ज मिळवून देण्याची तरतूद करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com