दुष्काळातही डाळिंबाचा अंबेबहार!

औरंगाबाद - सेलूद चारठा शिवारात संजय काकडे यांची सर्वत्र दुष्काळाने भकास दिसत असताना हिरवीगार दिसणारी डाळिंबाची बाग.
औरंगाबाद - सेलूद चारठा शिवारात संजय काकडे यांची सर्वत्र दुष्काळाने भकास दिसत असताना हिरवीगार दिसणारी डाळिंबाची बाग.

औरंगाबाद - तालुक्‍यातील लाडसावंगी मार्गाने जाताना रस्त्यात लागते सेलूद चारठा गाव. नजर जाईल तिकडे शेतजमिनी उघड्याबोडक्‍या पडलेल्या आहेत, अशा परिस्थितीत डाळिंबरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले शेतकरी संजय दगडू काकडे यांचा डाळिंबाचा ११ एकरांचा बाग हिरवागार दिसत असून सध्या अंबिया बहरावर आहे. बायोगॅसमधून निघणाऱ्या स्लरी आणि शेततळ्यांत साठविण्यात आलेल्या पाण्यामुळे हे सर्व शक्‍य झाले.

बायोगॅसमुळे रासायनिक खताचा वापर नसल्यातच जमा असून यामुळे शेतीचा उत्पादनखर्च कमी झाला आणि झाडांची उत्पादकता वाढल्याचे त्यांनी सांगितले.

सेलूद शिवारात १५ एकर शेतीत २००८ पासून टप्प्याटप्प्याने श्री. काकडे यांनी डाळिंब लागवडीला सुरवात केली. आज ११ एकर बागेत ४२०० झाडे आहेत. लाल कंधारी जातीच्या १३ गायी, वासरे आणि दोन म्हशी आहेत. संपूर्ण शेतीचे ऑटोमायझेशन केले आहे. शेतात एक एकर आणि ३० गुंठ्यांचे असे दोन शेततळे आहेत. सध्या एक एकराच्या शेततळ्यात १२ फूट, तर ३० गुंठ्यांच्या शेततळ्यात २५ फूट पाणी आहे. शेततळ्यातील पाणी विहरीत आणून बागेला दिले जाते. विहरीतून पाणी देताना तेही फिल्टर करून दिले जाते. डाळिंबाच्या बागेला दिलेल्या पाण्याचे सध्याच्या उन्हामध्ये बाष्पीभवन होऊ नये यासाठी प्लॅस्टिकच्या मल्चिंगला फाटा देऊन उसाच्या पाचटाचे नैसर्गिक मल्चिंग केले आहे. पाण्याचे बाष्पीभवन होत नसल्याने झाडांना दिलेल्या पाण्यामुळे जास्त काळ मुळांना ओल राहते आणि पाचटाचे कालांतराने सेंद्रिय खत तयार होऊन झाडांना मिळते. गेल्या वर्षी साडेपाच एकरांतून तब्बल ८० टन डाळिंब उत्पादन झाले, सेंद्रिय खतावर फळे पोसल्याने जास्त काळ टिकतात आणि त्यातील गोडवा वाढला आहे.

स्लरीने झाला खताचा वापर कमी
कृषी विभागामार्फत २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून १२ हजार रुपयांचे अनुदान मिळाले. त्यातून प्रत्येकी चार घनमीटरचे एक जमिनीलगत आणि एक प्लॅस्टिकचा असे दोन बायोगॅस तयार करण्यात आले. दहा हजार लिटर स्लरी जमा होईल इतका मोठा हौद तयार करण्यात आला आहे. गोठ्यातून निघणारे जनावरांचे मलमूत्र छोट्या हौदात पडते. त्यात पाणी टाकून त्याचे विद्युत मोटरीने मिश्रण तयार केले जाते आणि ते बायोगॅस प्लान्टमध्ये सोडण्यात येते. बायोगॅस प्लान्टमध्ये तयार झालेला गॅस स्वयंपाकासाठी वापरला जातो आणि स्लरी दुसऱ्या हौदात जाऊन पडते. ही स्लरी नंतर ट्रॅक्‍टर ट्रॉलीत ठेवून त्यात पाणी मिसळून थेट झाडांच्या बुडाला टाकतो, असे संजय काकडे म्हणाले. 

बायोगॅसवर स्वयंपाक
भगवान काकडे म्हणाले, की बायोगॅसमुळे स्वयंपाकाच्या गॅसचा प्रश्‍न मिटला आहे. पूर्वी दोन महिन्याला एक गॅस सिलिंडर लागत होते. आता सहा महिन्यांत एकदा सिलिंडर लागते. ८० टक्‍के गॅस हा बायोगॅसचाच वापरला जातो. विजेसाठी सोलर पॅनेल बसविले असून विजेचाही प्रश्‍न सुटला आहे. बायोगॅसच्या स्लरीमुळे फळांना चकाकी येते. फळ दहा पंधरा दिवस उशिरा तोडले तरीही टवटवीत राहते यामुळे बाजारातून सर्व माल विकला गेल्यानंतर आपली फळे विक्रीला येत असल्याने त्याचा दरात फायदा होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com