पावसाचा दीड महिना संपला; दुष्काळी स्थिती कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

 गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊन झाल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी तरी दमदार पाऊस होऊन दुष्काळ मिटेल, अशी आशा असताना पावसाने अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेली आहे.

बीड-  गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊन झाल्याने भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. यावर्षी तरी दमदार पाऊस होऊन दुष्काळ मिटेल, अशी आशा असताना पावसाने अनेक दिवसांपासून हुलकावणी दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा धास्तावला आहे. पावसाचा दीड महिना संपला तरी जिल्ह्यातील दुष्काळाची स्थिती कायम आहे. १४४ प्रकल्पांत सध्या ०. ५३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या सहा-सात महिन्यांपासून बेरोजगारीच्या प्रश्‍नाला तोंड देणारे मजूर सध्या मोठ्या संकटात सापडलेले आहेत. या सर्व परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी होताना दिसत आहे. जिल्ह्यात पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. गेल्यावर्षी तर ६६६.३६ मिमीच्या तुलनेत निम्माच पाऊस पडला. यामुळे वर्षभर पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पशुधनासाठी चारा व पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. यंदाच्या मॉन्सूनमध्ये समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत जिल्हावासीय होते; परंतु दीड महिना संपला तरी पाऊस झालेला नाही. सहा महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करणारे मजूरही मोठ्या अपेक्षेने पावसाकडे पाहत होते; परंतु पावसाने सर्वांच्या पदरात निराशा टाकली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: drought situation in beed

टॅग्स