गोदावरीच्या पाण्याने फुलवली कोरडवाहू शेती

बाळासाहेब लाेणे
रविवार, 11 ऑगस्ट 2019

गंगापूर, ता. 10 (बातमीदार) : पारंपरिक शेती सोडून कोरडवाहू शेत बागायती करण्याचा निर्धार केला अन्‌ थेट गोदावरी नदीतूनच चाळीस लाख रुपये खर्चून शेतात पाइपलाइन केली. पाणी शेतात आणून शेतशिवार फुलवलं. ही किमया केली आहे गंगापूर शिवारातील प्रगतिशील शेतकरी माऊली रंगनाथ यादव व हरिभाऊ रंगनाथ यादव या दोन शेतकरी बंधूंनी.

गंगापूर, ता. 10 (बातमीदार) : पारंपरिक शेती सोडून कोरडवाहू शेत बागायती करण्याचा निर्धार केला अन्‌ थेट गोदावरी नदीतूनच चाळीस लाख रुपये खर्चून शेतात पाइपलाइन केली. पाणी शेतात आणून शेतशिवार फुलवलं. ही किमया केली आहे गंगापूर शिवारातील प्रगतिशील शेतकरी माऊली रंगनाथ यादव व हरिभाऊ रंगनाथ यादव या दोन शेतकरी बंधूंनी.

त्यांची सिद्धपूर रस्त्यावर चौदा एकर शेती आहे. परिसरातील गावागावांत पाण्याची ओरड असताना यादव बंधूंनी हिमतीने शेती केली. चार वर्षांपूर्वी शेतात पारंपरिक बाजरी, ज्वारी असे पीक घेतले जायचे. दुष्काळ कायम पाचवीला पुजलेला असायचा. त्यावर मात करायची असे दोन्ही बंधूंनी ठरविले आणि त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. पाइप व खोदाईची माहिती घेतली. गोदावरीतूनच पाणी शेतापर्यंत आणले. विशेष म्हणजे आठ केजी पाइपने पाणी आणल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याच्या आधारावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात यादव बंधूंनी डाळिंब, मोसंबी फळबाग करण्याचे ठरविले. त्यानुसार चार वर्षांपूर्वी तीन एकरांत सातशे साठ डाळिंब, तर तीन एकरांत पाचशे मोसंबी रोपांची लागवड केली.

उर्वरित क्षेत्रात कांदा, ऊस लावला. दोन वर्षांपूर्वी त्यांना खर्च वगळून डाळिंबाचे पंधरा लाख, मोसंबीतून साडेबारा लाखांचे उत्पन्न मिळाले. डाळिंब, मोसंबी यशस्वी ठरल्यामुळे दुष्काळातही फळबाग उत्पन्नाचा मुख्य स्रोत ठरला. यावर्षी डाळिंबाचे वीस लाख, मोसंबीतून पंधरा लाख रुपये अपेक्षित आहेत. कांदा पीकदेखील बाराशे क्विंटलपर्यंत होत असल्याने आर्थिक चणचण दूर होऊन समृद्धी आली आहे.

- माऊली यादव
 

शेतात पूर्वी पारंपरिक पीक घेतले जायचे. दुष्काळावर मात करून शेतात काहीतरी नवीन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार माहिती घेतली. गोदावरी नदीतूनच चाळीस लाख रुपये खर्चून पाइपलाइन केली. आता शेतीच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत आहे. यावर्षी डाळिंब, मोसंबीला भाव देखील चांगला असल्याने आर्थिक सुबत्ता येणार आहे.
- हरिभाऊ यादव  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dry field turn into green by godavari water