डीटीपी ऑपरेटरची तीन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

औरंगाबाद - महापालिकेत संगणक चालकाची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत डीटीपी ऑपरेटरकडून सव्वातीन लाख रुपये घेतले. त्यानंतर ऑपरेटरला बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केली. याप्रकरणी महापालिकेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला शनिवारी (ता. २३) रात्री जवाहरनगर पोलिसांनी अटक केली.

जवाहरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर नारायण भवरे (वय ४१, रा. महापालिका शाळा, गारखेडा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तो महापालिकेत सफाई कामगार आहे. दुधागिरी संभाजी नगारे (रा. हनुमाननगर) यांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नगारे यांचे गारखेड्यात डीटीपी व झेरॉक्‍स सेंटर असून, तेथे मनोहर भवरे कागदपत्रांची झेरॉक्‍स काढण्यासाठी जातो. त्यातून नगारे यांची भवरेशी ओळख झाली. देवळाईचा काही भाग २००९ ला महापालिका हद्दीत समाविष्ट झाला होता. ही बाब त्याने नगारे यांना सांगितली. देवळाईचा भाग महापालिकेत समाविष्ट झाल्याने महापालिकेत संगणक चालकाच्या जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागा भरण्यासाठी गरजू उमेदवार हवेत. या पदासाठी सव्वातीन लाख रुपये लागतील, असे त्याने नगारे यांना सांगितले. नगारे यांचा विश्‍वास संपादन करून २००९ ते २०१७ दरम्यान सव्वातीन लाख रुपये भवरे याने घेतले; परंतु नियुक्तिपत्र देण्यासाठी त्याने टाळाटाळ केली.

बनावट नियुक्तिपत्र
नगारे यांच्याकडून पैशाचा जास्तच तगादा होत असल्याने मनोहर भवरेने त्यांना बनावट संगणक चालकाचे नियुक्तिपत्र दिले. या पत्राद्वारे नगारे नोकरीसाठी रुजू होण्यासाठी गेले, त्यावेळी नियुक्तिपत्रच बनावट असल्याचे स्पष्ट झाले. भवरेने फसवणूक केल्याची बाब त्यावेळी उघड झाली.  

Web Title: DTP Operator Cheating Crime