थकबाकीमुळे घाटीच्या तीन इमारतींची वीज जोडणी रखडली 

योगेश पायघन
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

घाटी परिसरावर थकबाकी असल्याने सुरवातीला डेंटलच्या वसतिगृहालाही महावितरणणे वीज जोडणी दिली नव्हती; मात्र डेंटल आणि घाटी वेगवेगळ्या संस्था आहेत. हे पटवून देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या मध्यस्थीने त्यांनी वीज जोडणी मिळाली

औरंगाबाद - घाटी रुग्णालयामध्ये वर्षभरात पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह व मध्यवर्ती ग्रंथालय या दोन इमारतीत कामकाज सुरू झाले; तर सुपरस्पेशालिटी विंग रुग्णसेवेच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, घाटीच्या कर्मचारी निवास्थानांवर असलेल्या थकबाकीमुळे तीनही इमारतींना नव्याने वीजजोडणी द्यायला महावितरणणे नकार दिला आहे. त्यामुळे ही थकबाकी हप्त्यांत भरण्यासाठी तसेच व्याज माफीसाठी घाटी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

घाटी परिसरावर थकबाकी असल्याने सुरवातीला डेंटलच्या वसतिगृहालाही महावितरणणे वीज जोडणी दिली नव्हती; मात्र डेंटल आणि घाटी वेगवेगळ्या संस्था आहेत. हे पटवून देऊन सातत्याने पाठपुरावा केल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या मध्यस्थीने त्यांनी वीज जोडणी मिळाली; पण घाटीच्या नव्या इमारतींना थकबाकी भरल्याशिवाय जोडणी देणार नसल्याची भूमिका महावितरणणे घेतली आहे.

 

हे माहिती हवेच : आजारपण आल्यावर नको धावाधाव : जाणून घ्या आरोग्य योजना

त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सुपरस्पेशालिटी इमारत डिसेंबर अखेर सुरू करण्याचे निर्देश दिल्याने अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वीजजोडणीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. उपाधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना तत्काळ वीजजोडणीसाठी प्रयत्न करत आहेत. त्याला किती यश येते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यावरच सुपरस्पेशालिटी, मध्यवर्ती ग्रंथालय व पीजी होस्टेलच्या वीजजोडणीचे भविष्य अवलंबून आहे. 

हेही वाचा : औरंगाबादचे झाले काश्‍मीर  

महापालिकेने पळवले तोंडचे पाणी

घाटीला सुपरस्पेशालिटी विंगसाठी साडेतेरा लाख लिटर पाण्याची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासंदर्भात गेल्या दीड वर्षापासून महापालिकेकडे सातत्याने पाण्याच्या कनेक्‍शनची मागणी सुरू आहे. त्यावर दरवेळी वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. एप्रिल महिन्यात 13 लाख लिटर नव्हे केवळ व्हॉल्व टाकल्यावर बचत होणारे एक लाख लिटर पाणी देण्याचे तत्कालीन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी घाटीत झालेल्या संयुक्त बैठकीत स्पष्ट केले होते. मात्र आठ महिने सरले महापालिकेकडून अद्याप कनेक्‍शन मिळाले नाही. व्हॉल्वसाठीच्या कोटेशनचीही नुसतीच प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना पाणी मिळवण्यासाठी महापालिकेने घाटी प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळवले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the arrears, the electricity connection of the three buildings in the ghati was stopped