‘या’ कारणामुळे गुदमरतोय ज्येष्ठांचा श्वास

File photo
File photo

नांदेड : बालपण आणि म्हातारपण, या नाण्याच्या दोन बाजू. या दोन्ही अवस्था खूपच संवेदनशील असतात. आयुष्याच्या संध्याकाळी ज्येष्ठांना जशी आजारपणाची भीती असते, किंबहुना त्यापेक्षाही जास्त चिंता त्यांना आप्तस्वकियांकडून सातत्याने मिळणाऱ्या अपमान व वेदनादायक वागणुकीची वाटते. प्रेमाच्या दोन शब्दांसाठी आसुसलेल्या या वडीलधारी मंडळींचा जेव्हा पोटच्या पोरांकडूनच वारंवार छळ होतो, तेव्हा साहजिकच त्यांची घुसमट होतेय. दुर्दैवाने असंख्य कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सध्या या कटू अनुभवातून जात असल्याचे अत्यंत निराशा व क्लेषदायक चित्र सद्यस्थितीत बघायला मिळत आहे.

ज्येष्ठ नागरिक एकेकाळी भारतीय संयुक्त कुटुंब पद्धतीचा कणा मानले जात होते. आजोबांच्या अंगाखांद्यावर नातू खेळायचे आणि नातवाला आजोबांचा आधार असायचा. मात्र, कालौघात संयुक्त कुटुंबपद्धतीची जागा विभक्त कुटुंबाने घेतलीय. आज जागोजागी नवरा-बायको अन मुलं एवढीच कुटुंबाची व्याख्या झाली. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मुलाला मायबाप व आजी-आजोबाची गरजच वाटत नाही. करिअर, नोकरी आणि जीवघेण्या स्पर्धेत युवा पिढी बेधडकपणे संस्कार तुडवित भौतिक सुखाच्या मागे लागली आहेत. हे सर्व करताना कुठेतरी ‘करिअरिस्ट’ तरुणांकडून जाणता-अजाणता फार मोठ्या चुका होत आहेत. मुलांना सुखी व चांगले आयुष्य मिळावे, यात गैर नाही. प्रत्येक मायबापालाच तसे वाटते आणि वाटायलाही पाहिजे. पण, पोटच्या पोरांना जपताना वडीलधाऱ्या मंडळींकडेही दुर्लक्ष होऊ नये, याचीही काळजी त्यांनी घेणे अपेक्षित आहे.

 
मुलांची स्वार्थी वृत्ती
दिवसेंदिवस ‘जनरेशन’ गॅप वाढत आहे. मुलाने स्वार्थ बाजूला ठेवून थोडा समजूतदारपणा दाखवून ज्येष्ठांच्या चुका मोठ्या मनाने स्वीकारल्या तर ही समस्या दूर होऊ शकते. दुर्दैवाने आजची युवा पिढी हा मोठेपणा दाखवित नसल्यामुळे समस्या आणखीनच जटील होत चालल्या आहेत. कदाचित त्यामुळेच ज्येष्ठांची घुसमट वाढत चालली आहे. वृद्धांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतनीय व निंदनीय असून, पांढरपेशा समाजाला त्यांचे खरे रूप दाखविणारी आहे.


सर्वाधिक छळ महिलांचा
ज्येष्ठांना मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक, आर्थिक आणि वैद्यकीय स्थिती हे तीन घटक अतिशय महत्त्वाचे असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सेकंड इनिंग आनंद व सुखात जावी, तसेच त्यांची घरात घुसमट होऊ नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी ज्येष्ठ नागरिक मंडळे कार्यरत आहेत. त्यात आत्पस्वकियांनी दूर लोटलेल्या वृद्धांना मानसिक आधार दिला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, २०२५ पर्यंत वयाची साठ वर्षे ओलांडलेल्यांची संख्या तब्बल १०२ कोटीच्या घरात जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवरील अन्यायाच्या घटना त्या तुलनेत निश्चितच वाढणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वाधिक छळ महिलांना सहन करावा लागत असल्याचेही समोर आले आहे.
 
ज्येष्ठांनीही अशी घ्यावी काळी
संयुक्त कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अडचणीच्या काळात मुलाला त्यांचा सल्ला मार्गदर्शक ठरू शकतो. मात्र, अनेक मुलांना बापाची लुडबुड नको असते. परिस्थिती पाहून त्यांनी वागणे नेहमीच हिताचे असते. मुलाला सल्ला किंवा मार्गदर्शन हवे असेल तरच त्यांनी तो द्यायला पाहिजे. मुलानेही इगो किंवा अहंभाव बाजूला ठेवून वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखून, त्यांचा सल्ला निमुटपणे ऐकून घ्यावा. तरच बाप व मुलाच्या नात्यातील गोडवा कायम राहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com