‘या’ कारणामुळे तरुणींमध्ये वाढतोय न्यूनगंड 

प्रमोद चौधरी
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

बलात्कार आणि छेडछाडी या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. असे असले तरी, बदनामीच्या भीतीने मुली व पालकही गप्पच रहात असल्याने अत्याचारासारख्या प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याची बाब दररोजच्या घटनांवरून समोर आली आहे.

नांदेड : महाविद्यालय तसेच शिकवणीला जाताना अश्‍लील हावभाव करणे, कुणाच्यातरी नावाने चिडविणे, मिस्ड कॉल करणे अशा छेडछाडीच्या घटनांना तरुणींना नेहमीच सामोरे जावे लागते. अशा वेळी विशाखा समितीची मदत घेता येते. याबाबत मात्र मुलींना फारशी माहिती नसल्याची बाब समोर आली आहे.  

चित्रपट तसेच दूरदर्शनवरील मालिकांतील हिंसक दृश्‍यांचा समाजावर होत असलेला परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होऊ लागल्याने छेडछाडीचे, अत्याचाराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी प्रशासन कमी पडत असून, पालकांचीही उदासीनता वाढत्या प्रकरणांवरून समोर येत आहे. वर्गातील मुलीला चिडविणे, अश्‍लील हावभाव करणे असे प्रकार काही शाळांमध्ये, महाविद्यालय तसेच शिकवणीवर्गांमध्ये चालतात. 

हेही वाचा - ‘व्हॅलेटाईन डे स्पेशल’ : ‘अशू-मशू’ची यशस्वी प्रेम कहाणी...

विशाखा समिती नावालाच
अत्याचार, छेडछाडीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी शाळा-महाविद्यालयांत विशाखा समिती असते. मात्र, शिक्षक, विशाखा समिती अन पालकांकडे अशा तक्रारी केल्यानंतरही फारसा फरक न पडल्याने मुलींमधील न्यूनगंड वाढतच आहे. सहनशक्ती पलिकडे गेल्यावर आक्रोश केला, तर अशा मुद्यांवरून लहानमोठी भांडणे नेहमीच होतात. कोवळ्या वयात नेमके काय घडते? हे लक्षात न आल्यामुळे अनेकदा पीडित मुलीचा गोंधळ उडतो. तर महाविद्यालयीन जीवनात पाऊल टाकताच अशा प्रकारांना सामोरे गेल्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते.
 
‘विशाखा’ समिती माहितीच नाही
महिलांना संरक्षणासाठी तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी शाळा, महाविद्यालये, शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये विशाखा समिती स्थापन केली जाते. नांदेडातही शासकीय कार्यालये, महाविद्यालयांत अशा समित्या स्थापन झाल्याची माहिती आहे. मात्र, विशाखा समितीचे काम काय असते, कशा प्रकारच्या तक्रारी समितीपुढे मांडायच्या असतात, याबाबत पीएच.डी. करणाऱ्या विशाल सपकाळे या विद्यार्थ्याने सर्वेक्षण केले असता एकूण ८० टक्के मुलींना विशाखा समितीच माहीती नाही. तसेच पालकही याबाबत अनभिज्ञ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हेही वाचलेच पाहिजे - सांगा, आम्ही जगायचे तरी कसे : असं कोण म्हणालं आणि कशामुळे

अशीही करता येते तक्रार
आज सर्वांकडेच  स्मार्ट फोन आहेत. त्यावर ‘प्रतिसाद अॅप डाऊनलोड करून त्यावर छेडछाडीची तक्रार करता येते. मोबाईलवर डाऊनलोड केलेल्या अॅपमध्ये नाव, मोबाईल नंबर, नातेवाइकांचे नाव टाकल्यावर लाल रंगाची साईन येते. त्याला क्लिक केल्यावर जवळील पोलिस ठाण्याशी संंपर्क होतो. त्यामुळे छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पालकांनीही पेटून उठणे आवश्‍यक आहे. त्यांचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय पोलिस प्रशासनाला कारवाई करण्यात अडचण येते. 

...तरच आळा बसू शकेल
मुलींनीही न घाबरता तक्रार करावी. दामिनी पथकातर्फे घटनास्थळी मदत केली जाते. तक्रार दाखल करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यास, अशा प्रकारांना निश्‍चितच आळा बसणे शक्य आहे.
- पांडुरंग तायडे पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to this `Cause` Young People are Growing Neonatal Nanded News