सांगा, आम्ही जगायचे तरी कसे : असं कोण म्हणालं आणि कशामुळे  

प्रमोद चौधरी
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

अशीच दरवाढ होत राहिली तर जनतेने प्रतिनिधी कशासाठी निवडून द्यायचे. कोणतीही पूर्वसूचना न देता एकदम मध्यरात्रीतूनच दरवाढ केली जाते. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्‍कील होणार आहे. 

नांदेड : दैनंदिन वापरासाठी व अत्यावश्‍यक वस्तू म्हणून गॅस सिलेंडरचा वापर होतो. शासनाकडून गोरगरीब जनतेला माफक दरात सिलेंडर वाटप केले. त्यामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणारे लाकडे, भुसा, रॉकेल खूप मागे पडले आहे. परंतु, अत्यावश्‍यक झालेल्या गॅस सिलेंडरचा दर वाढत असल्याने आमचे बजेट कोलमडत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया महिलांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या.

सर्वसामान्य नागरिक गेला गोंधळून
शहरासह ग्रामीण भागामध्येही अगदी शेवटच्या घटकापर्यंत गॅस सिलेंडर पोचला आहे. प्रत्येकाकडे सिलेंडर असल्याने रॉकेल मिळत नाही. त्यामुळे सिलेंडरशिवाय पर्यायच उरलेला नाही. मात्र, त्याचे भाव पाहता तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्या जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया समाजामधून विशेषतः महिलांच्या तोंडून ऐकायला येत आहेत. गॅस सिलेंडरच्या सतत्या वाढत चाललेल्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक मात्र गोंधळून गेला आहे. 

हेही वाचा - नांदेडच्या महिलांना का होतो सासुरवास, वाचा कारणे...

महिन्याचे बजेट कोलमडणार
घरगुती गॅस सिलेंडरच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केवळ गॅस सिलिंडर दरवाढ नाही; तर त्याच्याशी जोडणाऱ्या सर्वच वस्तूंची दरवाढ होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे हा प्रश्‍न निर्माण होत आहे. महागाईला आळा बसविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ठोस कारवाईची करण्याची गरज आहे.  स्वयंपाक व गॅस गिझर यामुळे महिन्याला किमान दोन सिलिंडर लागतात. सध्या गॅस ७०३ रुपयांना मिळत होता, आता त्यात २७० ने वाढ झाल्याने ८४९ रुपयाला घरगुती तर व्यावसायिक एक हजार ४६१ रुपयांना भेटणार आहे. अर्थातच सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. 

काय म्हणतात महिला...

जगणे झाले अवघड  
शासनाने सातत्याने जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरात वाढ करीत सामान्य जनतेचे जगणे अवघड केले आहे. घरगुती गॅसच्या झालेल्या दरवाढीमुळे महागाईचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे. दरवाढ कमी करण्याऐवजी ती वाढवल्यामुळे खिशाला मोठी झळ बसणार आहे. - सुवासिनी देशपांडे, शिवनगर

 

हेही वाचलेच पाहिजे आम्हाला परीक्षेत यश मिळवणे झाले सुलभ ; असं कोण म्हटलं, ते वाचाच

गॅसची दरवाढ परवडणारी नाही

जीवनावश्‍यक वस्तूंची दरवाढ करण्याचा दर महिन्याला सपाटाच लावला आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी या जीवघेण्या महागाईत जगावे तरी कसे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गॅसची ही दरवाढ आता परवडणारी नाही. सरकारने याबाबींकडे लक्ष दिले पाहिजे. - सुवर्णा पाटील, शिवनगर
 
गॅसचा गैरवापर थांबवावा

गॅसचा होणारा गैरवापर थांबवावा. दरवाढीची गृहिणी म्हणून याचा निषेध करते. आधीच महागाई असताना केंद्र सरकारकडून सामान्यांची ही एक प्रकारची थट्टा आहे. वर्षभरासाठी नऊ टाक्‍या अनुदानित देणार आहेत. दर महिन्याला एक तरी टाकी मिळावी. - सप्नाली सुवर्णकार, रतननगर
 
शासनाचे चुकीचे धोरण

गॅसची दरवाढ ही महिलांच्या दृष्टीने धक्कादायक बाब आहे. पाच माणसांच्या कुटुंबाला दर महिन्याला एक टाकी पुरत नाही. त्यामुळे महिन्याला दीड टाकी लागते. पण, केंद्र सरकारचे वर्षभरासाठी नऊ टाक्‍या देण्याचे धोरण चुकीचे असून, यात बदल होणे गरजेचे आहे. - सारिका कुलकर्णी, संभाजीनगर
 
आमचे अंदाजपत्रकच कोलमडले

घरगुती गॅस सिलिंडरमध्ये २७० ते २८० रुपयांनी वाढ झाल्याने आता महागाईमुळे सर्वजण होरपळून निघतील; तर जीवनावश्‍यक वस्तूंचीही आता मोठ्या प्रमाणात दरवाढ होईल. या वाढत्या भाववाढीमुळे प्रपंचाचे अंदाजपत्रकच कोसळले आहे. - सुनंदा पाटील, बोधीसत्वनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tell us How we Live Nanded News