सुशिक्षित मतदारांचा मतदानास निरुत्साह; दोन दिवस सुट्या, उदासिनतेमुळे कमीच मतदान

सुहास सदाव्रते
Tuesday, 1 December 2020

सुशिक्षित असलेल्या पदवीधर मतदारसंघात मतदानास मतदारांचा निरुत्साह दिसून आला. पदवीधरांचे प्रलंबित असलेला अनुदान, जुनी पेन्शनसह सीएचबी प्रश्न कायम, दोन दिवस सुटीसह मतदानास उदासिनता दिसून आली.

जालना : सुशिक्षित असलेल्या पदवीधर मतदारसंघात मतदानास मतदारांचा निरुत्साह दिसून आला. पदवीधरांचे प्रलंबित असलेला अनुदान, जुनी पेन्शनसह सीएचबी प्रश्न कायम, दोन दिवस सुटीसह मतदानास उदासिनता दिसून आली. मराठवाडा पदवीधर निवडणूक मतदानास सुशिक्षित असलेल्या मतदारांचा उत्साह फारसा दिसून आला नाही. लोकसभा, विधानसभा यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाची किमान ८० ते ९५ टक्केवारी असते. परंतु सुशिक्षित, नोकरदार मतदार अधिक असलेल्या मतदारसंघात मतदान टक्केवारी मोठा चिंतनाचा व अभ्यासाचा विषय आहे.

जिल्ह्यातील ७४ बुथवर मतदारांनी आपला हक्क बजावला. जिल्ह्यात २९ हजार ७६५ मतदारांनी नोंदणी केलेली होती. एकूण झालेली नोंदणी आणि मतदानाची आकडेवारी पाहता टक्केवारी कमीच आहे. इतर निवडणुकीत मतदानाची टक्केवारीची आकडेवारी पाहता सुशिक्षित असलेल्या पदवीधर मतदारांची टक्केवारी चिंताजनक बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जालना शहरात ९ हजार १० मतदार आहेत. परंतु मतदानाच्या दिवशी शहरातील मतदान केंद्रावर बऱ्‍याच वेळ शुकशुकाट पाहायला मिळाला. ग्रामीण भागात मतदानास उत्साह काहीसा दिसून आला तसा शहरी भागात दिसून आला नाही.

वीस वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षक अनुदान, जुनी पेन्शन योजना यासह वरिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिकेवर काम करणारे शेकडो प्राध्यापक यांचे प्रश्न कायम आहेत. यामुळेच कदाचित मतदानास उत्साह दिसून येत नसल्याची चर्चा मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या विविध पक्षांच्या मंडपात असलेल्या संपर्क कक्षात दिवसभर चालू होती. सलग दोन दिवस आलेल्या सुट्यांचा परिणामही मतदानावर झाला असल्याचे संतोष राजगुरु यांनी सांगितले. जालना शहरासह ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर पाच तासांत मतदानाची आकडेवारी पंचवीस टक्क्यांच्या पुढे गेली नव्हती.

 

पदवीधरांचे प्रश्न कायम आहेच.समस्या सुटलेल्या नाहीत. राजकीय पक्षांकडून पूर्णच प्रश्न सोडविले जातील असेही नाही.दोन दिवस सलग सुट्याही होत्या.सुशिक्षित मतदारांची मतदान टक्केवारी कमी असणे ही चिंतनाची बाब आहे.
- ज्ञानोबा वरवट्टे, केंद्रीय सदस्य,  मराठवाडा शिक्षक संघ

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Educated Voters Not Excited For Voting Aurangabad Graduate Election