धक्कादायक : हिंगोलीत चार महिन्याच्या बालकासह आठ जण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

हिंगोली जिल्ह्यात रविवारी आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. यात एका चार महिन्याच्या बालकासह नऊ व बारा वर्षीय बालिकेचा समावेश आहे. या बालकांचे पालक मुंबईहून हिंगोली जिल्ह्यात आले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८० वर पोचली असून यातील १०५ रुग्ण बरे झाले आहेत. 

हिंगोली : वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या चार महिन्याच्या बालकासह जिल्ह्यातील इतर आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल रविवारी (ता.३१) प्राप्त झाला.  त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता १८० वर पोचली असून यातील १०५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. सध्या ७५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्राने दिली.  

वसमत येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये सहा संशयितांना उपचारासाठी भरती करण्यात आले होते. यातील एका चार महिन्याच्या बालिकेसह सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. यात हे सर्व रुग्ण मुंबईहून वसमत तालुक्यात आले होते. 

हेही वाचाकळमनुरीत बारा हजार गावकऱ्यांची घरवापसी 

दिवसभरात आठ जणांना कोरोनाची लागण

तसेच हिंगोली येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नऊ व १२ वर्षीय बालिकेलाही कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे पालक मुंबईहून हिंगोली तालुक्यात आलेले आहेत. त्यामुळे दिवसभरात आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या एकूण संख्या १८० झाली असून सध्या कोरोनाबाधित ७५ रुग्ण उपचार घेत आहेत.

सहा रुग्ण कोरोनामुक्त 

वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या हट्टा येथील तीन, वसमत शहरातील दोन व जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात उपचार घेत असलेला भिरडा येथील रुग्ण ठणठणीत बरा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेवून घरी परतलेल्या कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १०५ वर पोचली आहे. 

हिंगोलीत १३ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात सध्या ७५ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून यात कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये  आठ, सेनगाव १२, हिंगोली ३१, वसमत ११, जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात औंढा येथील पाच, सुरजखेडा एक, समुदाय आरोग्य अधिकारी एक, पहेणी दोन, माझोड एक, चोंडी खुर्द एक, बाराशीव दोन रुग्णांचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून इतर कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्ह्यात बरसला पाऊस 

२५५ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित

आतापर्यंत आयसोलेशन वॉर्ड व जिल्ह्यातील कोरोना सेंटरमध्ये एकूण दोन हजार २५५ संशयितांना भरती करण्यात आले होते. यापैकी एक हजार ८९३ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एक हजार ७७७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आजघडीला ४६६ संशयित रुग्णालयात भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २५५ संशयितांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eight People, Including A Four-Month-Old Baby, Are Coronary Hingoli News