जायकवाडी धरणाने ओलांडली ८० टक्के पाणीपातळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

मराठवाड्यातील महत्वाचे असे जायकवाडी धरणाचे ८० टक्क्यांची पाणी पातळी ओलांडली आहे.

औरंगाबाद - मराठवाड्यातील महत्वाचे असे जायकवाडी धरणाचे ८० टक्क्यांची पाणी पातळी ओलांडली आहे. आवक पाहता माजलगावकडे सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे. 

नाशिक आणि नगर भागात यंदा जोरदार पाऊस झाल्याने जायकवाडीच्या वरची धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाऊस झाल्यास वरच्या काठोकाठ भरलेल्या धरणातून विसर्ग करण्यात येतो आहे. ३१ हजार क्यूसेकने जायकवाडी धरणात शनिवार (ता. १०) पर्यंत सुरू असलेला ओघ रविवारी (ता.११) सकाळी 63 हजार क्यूसेकवर पोचला. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत पुन्हा झपाट्याने वाढ व्हायला लागली आहे. शनिवारी रात्री दहाला ७७.१२ टक्के भरले असलेले जायकवाडी पुढील अकरा तासात ३.३५ टक्के वाढून ८०.४७ टक्क्यांवर पोचले आहे. आवक पाहता जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगावकडे पाणी सोडण्यात येत आहे. सुमारे दोन दिवसांपासून सुरू असलेला हा प्रवाह ४०० क्यूसेक एवढा होता, तो आता ६०० क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. जायकवाडीत एकूण २४८५.१५ दश लक्ष घनमीटर एवढा जिवंत पाणीसाठा आहे. यंदा या धरणातून सुमारे २ महिने मृत साठ्यातून उपसा करावा लागला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eighty percentage water level across Jaikwadi dam