शिवसेनेचे १२ ते १४ खासदार संपर्कात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv sena mp in touch BJP

शिवसेनेचे १२ ते १४ खासदार संपर्कात

नांदेड : गेल्या अडीच वर्षांत महाआघाडी सरकारमुळे जनतेला मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. त्यामुळेच महाआघाडीचे सरकार घरी बसले. त्याचबरोबर जनतेला त्रास होऊ नये म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. दरम्यान, शिवसेनेचे १२ ते १४ खासदार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी रविवारी (ता. तीन) केला.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्याबद्दल भाजपतर्फे खासदार चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी दुचाकीफेरी काढण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नांदेड जिल्ह्यात भाजपचे चार आणि शिंदे गटाचे एक असे पाच आमदार आहेत. त्यापैकी मंत्रिपदाची संधी द्यावी तसेच भाजपचा पालकमंत्री असावा, अशीही मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असून, पक्ष जो आदेश देईल तो मान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेड महापालिकेची निवडणूक तोंडावर असून कॉँग्रेसने खड्डे खोदणे व रस्ते करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या अडीच वर्षांत सत्ता असूनही काहीच केले नाही, असा टोलाही त्यांनी पालकमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण यांनी लगावला. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीबाबतही आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून, नाशिकच्या धर्तीवरही या बैठकीलाही स्थगिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्ता आली की उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे अनेकजण असतात. न मागता समर्थन दिले असेल तर त्याला फार किंमत राहत नाही, असा टोलाही त्यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांचे नाव न घेता लगावला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात नांदेड जिल्ह्यात राजशिष्टाचार पाळला गेला नव्हता. खासदारांचे नाव कुठेही येणार नाही, याची सत्ताधारी मंडळी दक्षता घेत होती. मात्र, आता शिंदे-फडणवीसांचे सरकार आले असून राजशिष्टाचार पाळला जाईल. अवैध धंदेही बंद झाले पाहिजेत, अशा मताचा मी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीस महाराष्ट्राचे नेते

देवेंद्र फडणवीस हे कुण्या एका समाजाचे नेते नाहीत. ते महाराष्ट्राचे नेते आहेत. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी भाजपचे १०६ आणि इतर आमदारांना एकत्र ठेवले. राज्यात पक्ष संघटन मजबूत केले. राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारे खूप पाहिले आहेत. पण मुख्यमंत्रीपद मिळत असतानाही पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का होता. पक्ष जो आदेश देईल, ते मान्य करणारे आम्ही आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Eknath Shinde Rebel New Government Shiv Sena Mp In Touch Bjp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..