झोपडीच्या आगीत वृद्धेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

झोपडीला लागलेल्या आगीत झोपलेल्या वृद्धेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. चंदाबाई परभती साके (वय 65 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे.

आष्टी (जि. आष्टी) - झोपडीला लागलेल्या आगीत झोपलेल्या वृद्धेचा होरपळून जागीच मृत्यू झाला. चंदाबाई परभती साके (वय 65 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे.

झोपडीत झोपलेला वृद्ध अपंग भाऊ व भाचा या घटनेतून सुदैवाने बचावले. तालुक्‍यातील पिंपळगाव दाणी येथे शुक्रवारी (ता. 26) रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. 
चंदाबाई परभती साके या पायाने अपंग असलेला त्यांचा भाऊ साहेबराव परभती साके (70) याच्यासह गावाशेजारी शेतामध्ये झोपडीत राहत होत्या. त्यांचा भाचा रेवननाथ कचरू साके (22) हा त्यांना भेटण्यासाठी आला होता. काल रात्री चंदाबाई साके झोपडीत झोपी गेल्या. साहेबराव व रेवननाथ हे दोघे झोपडीच्या दाराजवळ झोपी गेले. रात्री साडेअकराच्या सुमारास झोपडीने अचानक पेट घेतला. शेतात एकमेव झोपडी असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही. त्यामुळे झोपडीच्या आतील बाजूस झोपलेल्या चंदाबाई यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला.

झळा लागताच जागे झालेल्या साहेबराव साके व रेवननाथ साके यांनी झोपडीबाहेर धाव घेतल्याने ते बचावले. झोपडीत लावलेल्या दिव्यावर प्लास्टिकचे भांडे ठेवले होते. मांजराचा धक्का लागल्याने ते दिव्यावर पडून ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्‍यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elderly woman dies in fire at Pimpalgaon Dani

टॅग्स