विजेचा धक्का लागून मच्छिमाराचा मृत्यू

sopan dubhalkar
sopan dubhalkar

सेनगाव (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्यातील सालेगाव शिवारात येलदरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या मच्छिमाराचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.नऊ) दुपारी घडली. सोपान रंगनाथ दुबलकर (वय २२, रा. डोंगरगाव) असे मयत मच्छिमाराचे नाव आहे. येलदरी धरणाच्या पाण्यामध्ये विद्युत तारेचा स्पर्श होत असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडल्याची चर्चा गावकऱ्यांतून होत आहे.

सोपान दुबलकर हे सोमवारी (ता.नऊ) दुपारी ते नेहमी प्रमाणे सालेगाव शिवारातील येलदरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्यामध्ये होडीवर उतरून जाळे टाकत असताना त्यांचा पाण्यात लोंबकाळणाऱ्या तारेला स्पर्श झाला. या वेळी विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सेनगावचे पोलिस निरीक्षक बाबूराव जाधव, भीमराव चिंतारे, हिम्मत राठोड, मांगीलाल चव्हाण, अंकुश राठोड, विठ्ठल चव्हाण, वामन राठोड, सुदाम राठोड, सुरेश राठोड, भगवान राठोड आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. 

आपत्कालीन पथकास पाचारण 

सोपानचा मृतदेह पाण्यातील होडीवर तरंगत असल्याने तो काठावर आणणे अशक्य होते. त्यामुळे पोलिस कर्मचारी सरदार सिंह ठाकूर यांनी ही माहिती तहसीलदार जीवककुमार कांबळे यांना दिली. त्यानुसार आपत्कालीन पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मंगळवारी (ता.दहा) दुपारी मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद सेनगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली. दरम्‍यान, मयत सोपान यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी असा परीवार आहे. गतवर्षीच त्यांचा विवाह झाला होता. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना अपत्य प्राप्त झाले होते.

सेनगाव तालुक्यात सर्वाधिक घटना


सेनगाव तालुक्यात विजेचा धक्का लागून जखमी होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यामध्ये काही जणांना प्राणासही मुकावे लागले आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणच्या तारा जीर्ण झाल्या आहेत. विद्युत खांबही अनेक ठिकाणी वाकले आहेत. शेतातील खांबाची तर अवस्था दयनिय झाली आहे. हाताला स्पर्श होतील एवढ्या अंतराव तारा खाली आल्या आहेत. रोहित्रही वस्तीमध्ये बसविण्यात आले आहेत. त्यामुळे धोका निर्माण होत आहे. या बाबत शेतकरी, गावकऱ्यांकडून तक्रारीही करण्यात येत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. येलदरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये देखील अनेक दिवसांपासून विद्युत तारा लोंबकळत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्‍थ सांगत आहेत. आता तरी याकडे लक्ष देवून वीज तारा सुरळीत करण्यात याव्यात,अशी मागणी केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com