महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एकासह चार जनावरांचा मृत्यू, चाकूर तालुक्यातील घटना

प्रशांत शेटे/धर्मराज साबदे
मंगळवार, 31 मार्च 2020

शिवणीमंजरा (ता.चाकूर) येथे दोन दिवसांपासून विजेचा तार तुटून पडला असून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीसह चार जनावरांना प्राण गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (ता.३१) सकाळी घडली. सोमवारी (ता.३०) सायंकाळी झालेल्या पावसाने मुख्य विद्युत वाहिनीचे तार तुटले होते.

चाकूर/जानवळ (जि.लातूर) ः शिवणीमंजरा (ता.चाकूर) येथे दोन दिवसांपासून विजेचा तार तुटून पडला असून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीसह चार जनावरांना प्राण गमवावा लागल्याची घटना मंगळवारी (ता.३१) सकाळी घडली. सोमवारी (ता.३०) सायंकाळी झालेल्या पावसाने मुख्य विद्युत वाहिनीचे तार तुटले होते. ग्रामस्थांनी याची माहिती दिल्यानंतरही दुपारी दोन वाजेपर्यंत महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आला नसल्यामुळे ग्रामस्थांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

शिवणीमंजरा गावाच्या जवळ महावितरणच्या मुख्य लाईनवरील तार दोन दिवसांपूर्वी तुटुन पडला आहे. ग्रामस्थांनी याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना देऊन त्याचा विद्युत पुरवठा खंडित करावे असे सांगितले होते. परंतू दोन दिवसानेही संबंधीत लाईनमनने याची दखल घेतली नाही. मंगळवारी (ता.३१) सकाळी दहाच्या सुमारास गावातील उत्तम विठ्ठल आलापरे (वय ४८) हे जनावरे चारण्यासाठी जात असताना त्यांच्यासह जनावरांना तारांचा स्पर्श झाला. यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. तसेच तीन म्हशी व एक गायही मृत्युमुखी पडली आहे. घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिली. परंतू दुपार पर्यंतही महावितरण, महसुल व पोलीस प्रशासनाचा एकही व्यक्ती घटनास्थळी आला नव्हता.

अहमदपूर तालुक्यातील रहिवाशी
उत्तम आलापरे हा मुळचा गुंजीटी (ता.अहमदपूर) येथील रहिवासी. पण लहानपणापासून शिवणी (म.) येथील मधूकर चामे यांच्या शेतात गुराखी व नंतर सालगडी म्हणून काम करीत होते. मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान गाय व म्हशी चारत असताना विजेच्या धक्का लागला. यात त्यांचा, गाय व तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाला. उत्तम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

 

वाचा ः कोरोना ः परदेशातून आलेल्या त्रेपन्न जणांचे अहवाल निगेटिव्ह

त्यांनी उभा केला नवीन संसार, आगीत खाक झाले होते घर
हेर (जि.लातूर) ः हेर (ता.उदगीर) येथील संतोष सोपान सुर्यवंशी यांचे घर जळुन खाक झाले आहे. त्यांना शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. परंतु हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ.संजय सांडोळकर  व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेविका दैवशाला मुंडे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार तवंडे यांनी मिळून या गरीब कुटुंबाचा नवीन संसार उभा करून दिला आहे. यामध्ये वाघमारे यांनी संसारात लागणारी सर्व भांडी व नगदी दोन हजार रुपये व डॉ.सांडोळकर यांनी घरात लागणारा किराणा माल, तर सेविका मुंडे व तवंडे यांनी एक क्विंटल ज्वारी अशी मदत सुर्यवंशी कुटुंबीयांना केली आहे.  

ता.२७ मार्च रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हेर परिसरात जोराचे वादळ सुटले होते. त्यात अचानक सुर्यवंशी यांच्या घराला आग लागुन अख्खे घर जळुन खाक झाले होते व अंगणात बांधलेली एक म्हैस आगीत दगावली होती. त्यामुळे सुर्यवंशी यांचा पुर्ण संसारच उघड्यावर आला आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामा करून शासनाकडे अहवाल सादर केला होता. परंतु शासनाकडून अद्याप मदत मिळाली नाही. सोमवारी (ता.३०) वैद्यकीय अधिकारी रवि वाघमारे, डॉ. संजय सांडोळकर, दैवशाला मुंडे, राजकुमार तवंडे यांनी संतोष सुर्यवंशी यांना संसार उपयोगी साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी दाखवली आहे.  यावेळी ग्रामविकास अधिकारी बाबुराव मुसळे, अविनाश सुर्यवंशी यांच्यासह सुर्यवंशी कुटुंबीय उपस्थित होते.  दरम्यान ही मदत सामाजिक बांधिलकी म्हणून  असुन याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवुन दिला आहे. पाठपुरावा चालु आहे व लवकरच  शासनाकडून मदत  मिळणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी दिली.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Electric Shock Claims One Man With Four Cattles, Chakur