
देवर्जन येथील युवक शेतकरी सुनील गंगाधर रोडगे (वय-२५) हा शेतीला पाणी देण्यासाठी देवर्जन मध्यम प्रकल्पालगत असलेली मोटार चालू करण्यासाठी गेला होता.
उदगीर (जि.लातूर) : देवर्जन (ता.उदगीर) येथे विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता.नऊ) सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की देवर्जन येथील युवक शेतकरी सुनील गंगाधर रोडगे (वय-२५) हा शेतीला पाणी देण्यासाठी देवर्जन मध्यम प्रकल्पालगत असलेली मोटार चालू करण्यासाठी गेला होता. मोटार चालू करत असताना त्या शॉक लागला अन् तो पाण्यात फेकला गेला.
त्यास तातडीने उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. एक उमदा तरुण शेतकरी, अतिशय मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व, मित्र कंपनीत आवडता असणाऱ्या या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने देवर्जन गावावर शोककळा पसरली आहे.
येथील सामान्य रुग्णालयात त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती दवाखान्याचे पोलिस कर्मचारी सिकंदर शेख यांनी दिली आहे.
शासकीय मदत हवी
देवर्जन येथील एका सामान्य कुटुंबातील युवक शेतकरी असून त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व मुले असा परिवार आहे. या परिवारावर आता दुःखाचा डोंगर कोसळला असून या परिवारास तातडीची शासनाची मदत मिळावी, अशी मागणी देवरायांच्या ग्रामस्थांनी केली आहे.