वीज कंपनीच्या कामांचा होणार भांडाफोड

मंगेश शेवाळकर
रविवार, 2 डिसेंबर 2018

जिल्ह्यात आदिवासी गावांपर्यंत विज पोहोचविणे तसेच लाभार्थ्यांना विद्युत मिटर देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून मागील सहा वर्षात देण्यात आलेल्या निधीची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे विज कंपनीच्या कामांचा भांडाफोड होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. 

हिंगोली ः जिल्ह्यात आदिवासी गावांपर्यंत विज पोहोचविणे तसेच लाभार्थ्यांना विद्युत मिटर देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून मागील सहा वर्षात देण्यात आलेल्या निधीची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे विज कंपनीच्या कामांचा भांडाफोड होण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात सुमारे शंभरावर शंभर टक्के आदिवासी गावे असून काही गावांमधून दहा ते तीस टक्यांपर्यंत आदिवासी समाज राहतो. या आदिवासी गावांमधून वीज पुरवठा रहावा, तसेच गावकऱ्यांना मोफत वीज उपलब्‍ध करून देण्यासाठी आदिवासी प्रकल्‍प कार्यालयाकडून वीज कंपनीला दरवर्षी अनुसूचित जमाती उपयोजनेतून निधी दिला जातो. सन 2012 पासून एकात्‍मिक आदिवासी प्रकल्‍प कार्यालयाकडून वीज कंपनीला हा निधी दिला जात असून निधी प्राप्‍त झाल्‍यानंतर वीज कंपनीकडून संबधित गावात रोहित्र बसवणे, नवीन रोहित्र बसवून वीज पुरवठा सुरळीत करणे, लाभार्थींना नवीन मिटर देवून वीज पुरवठा देणे, आदी कामे केली जातात. वीज कंपनीकडून या कामांसाठी आदिवासी प्रकल्‍प कार्यालयाकडे निधीची मागणी केली जाते. 

जिल्‍ह्‍यात मागील सहा वर्षात प्रकल्‍प कार्यालयाकडून दरवर्षी दोन कोटी याप्रमाणे आतापर्यंत बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वीज कंपनीने चालू वर्षासाठी दोन कोटी रुपयांच्‍या निधीची मागणी प्रकल्‍प कार्यालयाकडे नोंदवली आहे. दरवर्षी सुमारे दोन कोटीचा निधी दिला असतानाही अनेक गावातून वीज पुरवठयाचा प्रश्न कायम आहे. याशिवाय लाभार्थ्यांना विद्युत मिटर देताना त्‍यांच्‍याकडून अनामत रकमा घेतल्‍या जात असल्‍याच्या तक्रारी प्रकल्‍प कार्यालयाकडे प्राप्‍त होवू लागल्‍या आहेत. याबाबतची माहिती प्रकल्‍प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी जिल्‍हा प्रशासनाला दिली होती. त्‍यानंतर जिल्‍हा प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करण्याच्या सूचना दिल्‍या होत्‍या. 

त्‍यानुसार मागील सहा वर्षातील निधीच्‍या चौकशीसाठी समिती स्‍थापन केली आहे. यामध्ये पथक प्रमुख म्‍हणून प्रकल्‍प अधिकारी डॉ. राठोड यांच्‍यासह सहाय्यक पथकप्रमुख म्‍हणून सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी ए.पी पवार, वीज कंपनीचे अभियंता व प्रकल्‍प अधिकारी कार्यालयातील सांख्यिकी सहाय्यक ओ.पी. टिकस यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नांदेडच्‍या वीज कंपनीच्‍या वरिष्ठ अभियंत्‍यांना देण्यात आली आहे. पुढील काही दिवसातच या निधीतून झालेल्‍या कामाची सविस्‍तर चौकशी केली जाणार आहे. त्‍यामुळे वीज कंपनीने बारा कोटी रुपयांमधून केलेल्‍या कामाचा भांडाफोड होणार आहे.

उर्जामंत्र्याकडे अहवाल पाठवणार - डॉ. विशाल राठोड, प्रकल्‍प अधिकारी
वीज कंपनीला देण्यात आलेल्‍या निधीतून झालेल्‍या कामाची सखोल चौकशी केली जाईल. किती लाभार्थ्यांना वीज मिटर देण्यात आले. तसेच किती ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्यात आले यासह इतर अहवाल याची सविस्‍तर माहिती घेतली जाईल. याबाबतचा अहवाल उर्जामंत्री, उर्जा सचिव यांच्‍यासह वीज कंपनीचे सहाय्यक महाव्यवस्‍थापक ओमप्रकाश बकोरिया यांना पाठवला जाणार आहे.

Web Title: The electricity company's work are frozen