मराठवाड्यात सव्वालाख सदोष वीज मीटर

अनिल जमधडे
शुक्रवार, 15 जून 2018

औरंगाबाद - महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबारसह अकरा जिल्ह्यांमध्ये नादुरुस्त मीटरची संख्या लाखोंमध्ये गेली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या वीजबिलावर पाणी फेरले आहे. एकूण दीड लाख नादुरुस्त मीटरपैकी गेल्या काही महिन्यांत 22 हजार मीटर बदलण्यात आले. अद्यापही सव्वा लाख विद्युत मीटर बदलण्याचे आव्हान महावितरणच्या यंत्रणेपुढे आहे.

महावितरणला महापारेषणकडून मिळणारी वीज आणि महावितरणने वितरित केलेल्या विजेचा परतावा यामध्ये प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये वीजगळतीचे प्रमाण तीस टक्के आहे. या वीजगळतीबरोबरच नादुरुस्त मीटरची संख्या लाखोंमध्ये गेली आहे. महावितरणने महापारेषणकडून घेतलेल्या एकूण विजेचा संपूर्ण परतावा मिळत नसल्याने महावितरणची यंत्रणा अडचणीत सापडली आहे.

महावितरणने गेल्या दोन महिन्यांत औरंगाबाद परिमंडळात जवळपास पाच हजार फॉल्टी मीटर बदलले आहेत. आणखी महिनाभरात सर्व मीटर बदलण्याचे नियोजन आहे. फॉल्टी मीटरच्या ग्राहकाला नव्या मीटरच्या ऍव्हरेजप्रमाणे बिल देऊन सर्व वसुली करण्यात येणार आहे.
- सुरेश गणेशकर, मुख्य अभियंता औरंगाबाद परिमंडळ.

Web Title: electricity meter