esakal | Breaking : पाण्यात अडकलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात यश, बापलेकाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Hit Umarga

उमरगा तालुक्यात पावसाच्या पाण्यात अडकलेल्या ११ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून कदेर येथे बापलेकाला पाण्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न महसूल पथकाकडून सुरु आहे.

Breaking : पाण्यात अडकलेल्या ११ जणांना बाहेर काढण्यात यश, बापलेकाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा शहर व तालुक्यातीत मंगळवारी (ता.१३) रात्रीपासून सुरु असलेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे संपूर्ण तालुका जलमय झाला आहे. शेतीचे नुकसान मोठे आहे. दरम्यान अकरा जण पाण्यात अडकले होते. त्यापैकी अकरा जणांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन व ग्रामस्थांना यश मिळाले. दरम्यान महसूल व पोलिस प्रशासन कदेर येथील बाप-लेकाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी बुधवारी (ता.१४) रात्री उशीरापर्यत महसूल पथकाकडून प्रयत्न सुरु आहेत.

उमरगा जलमय : गुलबर्गासह तालुक्यातील दहा मार्गावरील वाहतूक ठप्प 

अतिवृष्टी झाल्याने सर्व नदी, नाल्या ओसंडून वाहत होत्या. शेतात पाणी शिरल्याने पूरस्थितीत निर्माण झाली आहे. बुधवारी (ता.१४) सकाळी बेडगा गावाजवळील बेन्नीतूरा नदीच्या पुलावरून पाणी जात असताना ट्रॅक्टर पाण्याच्या प्रवाहात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सहा जण उडी ठोकून पोहत बाजूच्या स्मशानभूमीच्या स्लॅबवर थांबले होते. आजूबाजूला पाणी भरपूर असल्याने मासेमारीच्या बोटीने सायंकाळी राजेंद्र माने, राजेंद्र कुंभार, मैनोदिन चौधरी, राहुल ठाकूर, महेश गावडे, विठ्ठल पवार यांना ग्रामस्थांनी सुखरुप बाहेर काढले. नागराळ येथे पाण्यात अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले.

कदेर येथील बापलेक अडकले पाण्यात
कदेर येथील माजी सैनिक विकास येवते शेतातील पाण्यात एका झुडपाच्या ठिकाणी अडकले आहेत तर मुलगा अभिजित पाण्यातील गोट्यात अडकला आहे. नायब तहसीलदार रोहन काळे, विलास तरंगे, पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह मदन पाटील व ग्रामस्थांनी दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र यश आले नाही. महसूल प्रशासनाकडून बोट मागवून त्यांना बाहेर काढण्यासाठी उशीरापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान येणेगुर येथील हणमंत गुळावे यांच्या शेतातील कोट्यात पाणी असल्याने सहा जनावरे अडकली आहेत.

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले, ३५ मंडळात अतिवृष्टी, शेतकरी अडचणीत !

राजेगावचे देशमुख बंधू सुखरूप
लोहारा तालुक्यातील राजेगाव येथील पिंटू देशमुख, सतीश देशमुख यांच्या शेतात तेरणा नदीचे पाणी शिरल्याने शेतात पूरस्थिती निर्माण झाली. दोघेही बंधू पहिल्यांदा झाडावर चढले. पाणी वाढत असल्याने पुन्हा कसेबसे बाजूच्या कोट्यावर गेले. तेथेही पाणी. घटनास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क करून येथील स्थिती सांगितली. सांयकाळी लातूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी बोटीतून देशमुख बंधूंना सुखरूप बाहेर काढले. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्यासह महसूल व पोलिस अधिकारी घटनास्थळी होते.

संपादन - गणेश पिटेकर