हिंगोलीत अकरा हजार लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घरकुल 

file photo
file photo

हिंगोली : जिल्ह्यात मागेल त्याला घरकुल या पंतप्रधान योजनेतून ( ता.१०) सप्टेंबर अखेर ११ हजार ४१० लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळाले असून, पुढील काळात साडे पाच हजार घरकुलाची कामे पूर्ण होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक धनवंत कुमार माळी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे मार्फत घरकुल योजनेची कामे केली जात आहेत. जिल्ह्याला सर्व योजनेसाठी १७ हजार १७८  घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये १८ हजार ९७२ लाभार्थ्यांनी नावनोंदणी केली होती.आजपर्यंत११ हजार ४१० घरकुलाची कामे पूर्ण झाली असून,५ हजार ७६८ घरकुलाची कामे अपूर्ण आहेत. ज्याची टक्केवारी ६६.४२ टक्के आहे.

५ हजार ७०९ घरकुलाची कामे पूर्ण झाली

त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जिल्ह्याला ७ हजार ३९४ घरकुलांचे उद्दिष्ट दिले होते, यामध्ये सन १६-१७ ,ते १९-२० या चार वर्षात   दहा हजार ५०३ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ५ हजार ७०९ घरकुलाची कामे पूर्ण झाली आहेत. तर १६८५ कामे अपूर्ण आहेत. ज्याची टक्केवारी ७७.२१ एवढी आहे.रेती अभावी घरकुलाची कामे अपूर्ण आहेत.

पारधी योजनेतील ३५ पैकी ३५ घरकुलाची कामे पूर्ण झाली

याशिवाय रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्याला ६ हजार  ७६६ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट दिले होते, तर ५ हजार ८२९ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी तीन हजार ८३९ घरकुलाची बांधकामे पूर्ण झाली आहेत. तर दोन हजार ८२७ घरकुलाची बांधकामे अपूर्ण आहेत.ज्याची टक्केवारी ५८.२२ टक्के एवढी आहे. शबरी आवास योजनेमध्ये दोन हजार ९८३ घरकुलाचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले होते. तर दोन हजार ६०५ लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी एक हजार ७२७ घरकुलाची कामे पूर्ण झाली असून उर्वरित एक हजार २५६ घरकुलाची कामे अपूर्ण आहेत. तसेच पारधी आवास योजनेमध्ये ३५ घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी संपूर्ण कामे पूर्ण झाली असून ही योजना अनुसूचित जाती व जमाती साठी असल्याने चार हप्त्यात एक लाख वीस हजाराचा निधी उपलब्ध करून दिला जातो. पारधी योजनेतील३५ पैकी ३५ घरकुलाची कामे पूर्ण झाली असून ज्याची टक्केवारी १०० टक्के एवढी आहे.

घरकुलाच्या कामावर गदा कोसळली आणि सर्व कामे ठप्प झाली

जिल्ह्यात घरकुल बांधकामासाठी रेती मिळत नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली होती. लाभार्थ्यांनी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन घरकुल बांधकामासाठी रेती उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी झिरो रायल्टी वाहतूक पासेस मधून घरकुलांना रेती उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले होते. त्यामुळे रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळाली. हिंगोली, कळमनुरी, औंढा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी कयाधु पात्रातील हिंगणी, चाफनाथ तर औंढा तालुक्यातील लाभार्थ्यांना पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मात्र ऐन मार्च महिन्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने सुरु असलेल्या घरकुलाच्या कामावर गदा कोसळली आणि सर्व कामे ठप्प झाली. 

रेतीचे भाव गगनाला भिडल्याने पुन्हा लाभार्थ्यावर संक्रात

पुन्हा अनलॉक झाल्यानंतर कामे करण्यास सुरुवात झाली. परंतू पुन्हा वाळू घाटाचा लिलाव न झाल्याने वाळू माफिया कडून दुपटीने रेती विक्री करीत असल्याने रेतीचे भाव गगनाला भिडल्याने पुन्हा लाभार्थ्यावर संक्रात आली. त्यामुळे काही घरकुलाची कामे प्रगतिपथावर असून तीही कामे पूर्ण करण्याच्या सूचना ग्रामसेवकाना दिल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणा देखील घरकुले पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत

धनवंतकुमार माळी ( प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) : वाळू घाटाचे लिलाव अद्याप झाले नाहीत, तसेच लॉकडाऊन देखील शिथिल झाल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे पूर्ण करावीत, यासाठी प्रशासकीय यंत्रणा देखील घरकुले पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करीत आहोत. काही तांत्रिक बाबीमुळे घरकुलाची अपूर्ण कामे रखडली होती, ती आता तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com