Video - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती

file photo
file photo

घोगरी (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : नजीकच्या काळात पानमळ्यात कुशल कामगारांचा अभाव होण्याने, ‘नागेली पानमळा’ शेतीला मरगळ आल्याचे पहावयास मिळत असतानाच, चाभरा (ता. हदगाव) येथील एका युवा बागायतदाराने यात पारंपरिक शेतीचे मूल्य जपत एक हेक्टर शेतीवर पानमळा शेती फुलवून उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत वाढवून आपली प्रगती साधली आहे. शेतीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन करून अशा पध्दतीची शेती केल्याने नक्कीच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. या शेतकऱ्यांचा आदर्श जर अन्य शेतकऱ्यांनी घेतला तर शेती तोट्यात जाणार नाही. असा संदेश या तरुण शेतकऱ्यांनी दिला आहे.

येथील प्रगत शेतकरी संगमनाथ उमाजी मुरंकुटे, भगवान मुरकुटे, शंकर मुरंकुटे यांच्याकडे सिंचनाची एकूण 17 एकर जमीन असून, एकत्रित कुटुंब पद्धतीचा अवलंब करत त्यांनी खूप कष्टाची व किचकट असणाऱ्या पानमळा शेतीचे योग्य व्यवस्थापन व नियोजन, करून प्रगत शेती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. या परिसरातील पानमळा शेती ही पूर्वापार चालत आलेली शेती असून, या शेतीला कुशल मनुष्यबळाची आवश्यकताही महत्वाची बाब आहे. ज्यांना योग्य मनुष्यबळाची साथ मिळेल, तरच या शेतीतून उत्पन्न मिळू शकते. नजीकच्या काळात वाढलेल्या महागाईने मजुरीचे दर गगनाला भिडले असल्याने, कुशल कामगाराविना ही शेती करणे किफायतशीर ठरत नसल्याने, या पारंपारिक शेतीला मरगळ आल्याची दिसून येत आहे. व बहुतांश शेतकऱ्यांनी या शेतीला बगल दिल्याचे चित्र आहे.

इतर पिकातून मिळेल त्यापेक्षाही दुप्पट उत्पादन या पानमळ्यातून 

इतर भागाच्या तुलनेत या भागात मुबलक पाणी असल्याने, उत्पादनाच्या तुलनेत इतर भागापेक्षा हा भाग अग्रणी आहे. या भागात ऊस, केळी, हळद ही महत्वपूर्ण पीके घेतली जातात. परंतु या नागेली पान मळ्याची या पिकाला सर येत नसल्याचे बोलले जाते. जेवढे उत्पन्न इतर पिकातून मिळेल त्यापेक्षाही दुप्पट उत्पादन या पानमळ्यातून मिळत असल्याने, एकत्रित कुटुंब पद्धतीचा ज्या बळीराजाने अवलंब केला आहे, त्यांच्यासाठी ही शेती लाभदायी ठरत असल्याने या गावात आजही या परंपरागत शेतीचा अवलंब खूप मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो.
इतर पिकाच्या तुलनेत ही पानमळा शेती अल्प खर्चिक असून, त्याची लावगड ही सोपी आहे. शेवरी व शेवगा दाट पेरून, या दोन्हीची संख्या समतोल ठेवून, उंच वाढलेल्या या वृक्षावर ही पानवेल चढवण्यात येते. याची निंदणी खुरपणी वेळोवेळी करावी लागत असल्याने मनुष्यबळाची गरज नितांत आहे.

पानमळ्याची किमान आठ दिवसात तोडणी करावी लागते

लावणी झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यानंतर पानमळ्याच्या तोडीस सुरुवात होते. कळीचे पान, सरपटीचे पान, फापडा पान या विड्याच्या पानाल बाजारात महत्व असल्याने, कुशल कामगारांकरवी याचे वेगवेगळे विलीनीकरण करून, पत ठरवली जाते. या पानमळ्याची किमान आठ दिवसात तोडणी करावी लागते. परभणी येथे मोठी बाजारपेठ असल्याने शिवाय जास्तीचे पानकटे निघाल्यानंतर श्रीरामपूर, नाशिक या मोठ्या बाजारपेठेत ही पाने वाहनाद्वारे नेऊन विकली जातात. यामुळे या पानमळा शेतीतून भरघोस उत्पन्न मिळते.

शेवगा व शेवरी ही वृक्ष साथीला

काही कास्तकार ही शेती करण्याचा छंद जोपासतात. परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे त्यांनाही शेती वाट्याने द्यावी लागते. शिवाय या शेतीचा दुहेरी फायदा असून पानवेल उंच वृक्षावर चढवण्यासाठी शेवगा व शेवरी या वृक्षाचा उपयोग घेतला जातो. या वृक्षाला गडद छाया असल्याने उन्हाळ्यात सावली पासून यापान वेलीचे रक्षण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. शेवगा व शेवरी ही वृक्ष बकरी खाद्य असल्याने बहूतांश कास्तकार या शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय करताना दिसतात. यातून त्यांना मुबलक उत्पन्न मिळते. अशीही बहुगुनी पानवेल गरीब  कुटुंबीयांसाठी परवडणारी आहे.

सरकारने या शेतीकडे लक्ष द्यावे

अशा या बहुगुणी नागेली पानाला धार्मिक कार्यात, लग्नसमारंभात, याशिवाय देवपूजेत पान अर्पित करण्याची पुरातन काळापासून प्रथा आहे. पान विडा आरोग्याचा दृष्टीने लाभदायक असल्याने, चेहऱ्यावरील मुरूम, अंगाला खाज सुटणे, अन्नपचन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी पानविडा उपयुक्त असल्याने ग्रामीण भागात आजही नागेली पानाला अनन्य महत्त्व प्राप्त आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही पानमळा शेती जीवनदायी ठरत असूनही शासनाच्या वतीने अजूनही दुर्लक्षित आहे. या शेतीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

काय म्हणतात शेतकरी?

यंदा या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होण्याने विड्याच्या पानावर कीटकाचा, रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने यावर्षीच्या उत्पादनात कमालीची घट जाणवणार आहे. इतर पिकाच्या तुलनेत ही पान शेती लाभदायी असून , एक हेक्‍टर शेतीमध्ये सर्व खर्च वजा जाता कमीत कमी पाच ते सहा लाख रुपयांची मिळकत होण्याचा अनुमान आहे. इतर बागायतदारांनी या शेतीचे अनुकरण केल्यास हमखास उत्पादनाची हमी आहे.

- शंकर मुरंकुटे. पानमळा बागायतदार चाभरा.

या परिसरात पानमळा शेती आजही मोठ्या प्रमाणात टिकून आहे. कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटातही नागवेल पानाची, विक्री भरपूर झाली. (मार्केटिंग कमिशन एजन्सी) हराशी सोशल डिस्टंसिंग चे पालन म्हणून बंद होण्याने, उत्पादनावर मर्यादा येऊनही, ही उन्नत शेती लाभदायी आहे. -
- आनंदराव भंडारे, शेतकरी

मागे वळून पाहतांना जाणवलं की, वडीलधाऱ्या च्या वतीने, एकत्रित कुटुंब पद्धतीचा केलेला अवलंब खूपच चांगला होता. त्या काळाने खूपच चांगले संस्कार दिले, मनाला मुरड घालण्याची सवय लावली, सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याची संधी मिळाली. या जाणिवेतून एकोपा वाढल्याचे दिसून आल्याने आम्हीही याच स्त्री कुटुंब पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. याचा मनाला आनंद मिळतो आहे.
- संगमनाथ मुरंकुटे.. सदन शेतकरी चाभरा.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com