Beed Crime - अकरा वेळा पोटात चाकूचे वार, बाराव्या वेळी गळा कापला, मित्राला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

परळी वैजनाथ शहरातील बरकतनगर भागातील शेख मकदूम शेख कलंदर (वय ३०) व आरोपी शेख समीर शेख वल्ली हे दोघे जिवलग मित्र होते. मृत शेख मकदूम हा  आपल्या घरावर वाईट नजरेने पाहतोय, असा आरोपी शेख समीर शेख वल्ली याला संशय होता.

अंबाजोगाई (जि. बीड) - आपल्या घरावर वाईट नजरेने पाहत असल्याच्या संशयावरून परळी येथील बरकतनगर भागातील मित्रानेच आपल्या मित्राचा नंदागौळ शिवारात दुचाकीवर बसल्यानंतर पाठीमागून पोटात चाकूचे वार करून व गळा कापून खून केला. या प्रकरणी येथील अपर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी (ता. सहा) आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

याबाबत माहिती अशी : परळी वैजनाथ शहरातील बरकतनगर भागातील शेख मकदूम शेख कलंदर (वय ३०) व आरोपी शेख समीर शेख वल्ली हे दोघे जिवलग मित्र होते. मृत शेख मकदूम हा  आपल्या घरावर वाईट नजरेने पाहतोय, असा आरोपी शेख समीर शेख वल्ली याला संशय होता. ते दोघे तीन डिसेंबर २०१८ रोजी एका दुचाकीवरुन (एमएच-२३ ए ८६१६) अंबाजोगाईला पार्टी करण्याच्या बहाण्याने आले. पार्टीनंतर दोघेही नंदागौळमार्गे परळीकडे निघाले. अंबाजोगाईतून दुचाकीवरून दोघांना पाहिल्याची साक्ष एका साक्षीदाराने न्यायालयासमोर दिली. ही दुचाकी नंदागौळ शिवारात येताच आरोपी शेख समीर शेख वल्ली याने मृत शेख मकदूम शेख कलंदर याच्या पोटात धावत्या दुचाकीवरुन चाकू खूपसला.

हेही वाचा - बीड, केज, परळीत बियाणे कंपन्यांविरुद्ध सहा गुन्ह दाखल

शेख मकदूम जागीच कोसळताच त्याने पोटातील चाकू काढत अकरा वेळा पुन्हा पोटात चाकू खुपसला. यानंतरही तो मृत झाला नसावा म्हणून त्याने बाराव्या वेळा त्याचा गळा कापला. या घटनेत वापरलेला चाकू नंदागौळ शिवारात फेकून देत दुचाकी पुलाखाली लपून ठेवत त्यावर गवत झाकून ठेवले. रक्ताने माखलेले कपडे घरातील कपाटात लपवून ठेवत त्याने अपघात झाल्याचा बनाव केला; परंतु नातेवाईकांनी त्याच्यावर संशय घेतल्याने परळी ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.एम.शेळके यांनी तपास करुन आरोपीने घटनेत वापरलेली दुचाकी, चाकू व रक्ताने माखलेले कपडे जप्त करुन येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले. 

हेही वाचा - खतासाठी पैसे मिळाले नाहीत, बीडच्या शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, न्यायालयात सुनावणीदरम्यान आठ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. एका प्रत्यक्षदर्शीने त्या दोघांना दुचाकीवरून जाताना पाहिल्याची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली. रक्ताने माखलेल्या कपड्यांची तपासणी प्रयोगशाळेत केल्यानंतर ते रक्त हे मृताचे आढळून आले. प्रयोगशाळेच्या रक्ताचा अहवाल व दुचाकीवरून दोघांना जाताना पाहणाऱ्याची साक्ष ग्राह्य धरीत जिल्हा व सत्र  न्यायाधीश माहेश्वरी पटवारी यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व १५ रुपयांचा हजारांचा दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी बाजू मांडली. आरोपी जिल्हा कारागृहात असल्यामुळे त्याला व्हीसीद्वारे निकाल सुनावण्यात आला. या प्रकरणाकडे परळी तालुक्याचे लक्ष लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleven times stabbed in the stomach, twelve times cut throat, life imprisonment for a friend