परभणीच्या झरीमध्ये स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी उभारतेय चळवळ

अनिल जोशी
Wednesday, 14 October 2020

झरी गावाशेजारून वाहणाऱ्या दुधना नदीच्या काठावर उभारलेली हीच ती मॉडेल स्मशानभूमी

झरी (जिल्हा परभणी) :  काट्या-कुट्यांचा रस्ता... तोही पांदणासारखाच... सर्वदूर दुर्गंधी... गुडघ्यापर्यंतचे गाजर गवत... शोकाकुल कुटूंबियांसह नाते-गोते आप्त व अन्य व्यक्तींना बसणेच दूर, काही मिनिटे उभे राहण्याकरितासुध्दा जागा नसणे... मोडके तोडके शेड... त्यातून कसबसे आटोपल्या जाणारे अंत्यसंस्कार असे हे छोट्या- मोठ्या गावातील स्मशानभूमीचे चित्र कुठे तरी बदलावे हे हेतुने प्रगतशील शेतकरी कांतराव (काका) देशमुख यांनी तालुक्यातील झरी पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात अन्यत्र एक गाव एक स्वच्छ, सुंदर स्मशानभूमीची चळवळ सुरू केली आहे.

जवळपास 50 गावांमधुन या चळवळीस ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन त्या संकल्पनेस मूर्त स्वरूप द्यावयास सुरवात केली आहे. कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी परभणी - जिंतूर रस्त्यावरील दुधना नदीच्या काठावर म्हणजे झरी शिवारात स्वतःची जमीन स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून दिली. पाठोपाठ या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दोन शेड उभारले. तसेच ग्रामस्थांना बसण्या करिता सिमेंटची आसनव्यवस्था केली. तसेच या स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधून आत मोठ्या प्रमाणावर झाडे लावली. ती फुलवली. स्मशानभूमीस अक्षरशः बागेचे स्वरूप आणले.

हेही वाचास्लोमोशनमुळे मोठा अपघात टळला, सचखंडचे तीन डब्बे निसटले -

एक गाव एक स्वच्छ व सुंदर स्मशानभूमी

अन्य भौतिक सुविधासुद्धा उपलब्ध केल्या. आईच्या स्मरणार्थ उभारलेल्या या स्मशानभूमीचा पॅटर्न अन्य गावांमधुनसुध्दा मोठ्या प्रमाणावर राबवला जावा या दृष्टीने कांतराव देशमुख यांनी काही सहकार्‍यांबरोबर चर्चा केली. कानोसा घेतला. पाठोपाठ त्या- त्या गावातील स्मशानभूमीची एकंदरित विदारक अवस्था, अस्वच्छता, जागेबाबत वादविवाद, वेगवेगळ्या जाती-पातींच्या समस्या आदी गोष्टींचा विचार करीत एक गाव एक स्वच्छ व सुंदर स्मशानभूमीची चळवळ उभारण्याचा संकल्प केला. नव्हे त्यास मूर्त स्वरूपसुध्दा द्यावयास सुरवात केली.

स्मशानभूमीत स्वच्छतेसह अन्य सुविधा उपलब्ध

श्री. देशमुख यांच्या संकल्पनेतुन तालुक्यातील जांब, पारवा, नृसिंह पोखर्णी पाठोपाठ पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे आदी गावांमधुन ग्रामस्थांनी पुढाकार घेतला अन् स्मशानभूमीत स्वच्छतेसह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. जिल्ह्यात जवळपास 50 गावांमधून ही चळवळ यशस्वीरित्या मूर्त स्वरूप घेत असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

येथे क्लिक करा - नांदेड प्रशासनाने कसली कंबर, अवैध वाळूचा उपसा करेल अंदर... -

सेवानिवृत्तीच्या दिवशी आपण गावचे काही देणे लागते या भावनेतून

जिंतूर तालुक्यातील आसेगाव या गावी तेथील ग्रामस्थ भीमराव पवार यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी आपण गावचे काही देणे लागतो. या भावनेतून स्वखर्चाने आणि लोकसहभागातून आईच्या (कै. जानकाबाई पवार) स्मृतीप्रित्यर्थ दीड हजारावर झाडे लावून घनवनाची लागवड केली. ता. 31 जुलै रोजी कांतराव देशमुखांच्या प्रमुख़ उपस्थितीत वैकुंठधामात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दरम्यान, या चळवळीस आणखी व्यापक स्वरूप प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती कांतराव देशमुख यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emerging movement for a clean, beautiful cemetery in Parbhani Zari parbhani news