आयुक्तांच्या दणक्‍याने अतिक्रमणे भुईसपाट 

Encroachment
Encroachment

औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावर गेल्या 48 तासांत दोन महिलांचे बळी गेल्यानंतर संतप्त झालेले नागरिक सोमवारी (ता. 11) रस्त्यावर उतरले. त्यातील एका महिलेने अपघातात घरातील दोघांना गमविल्याची आपबीती आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर कथन केली. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी आंदोलनस्थळापासून बीड बायपासची पाहणी सुरू करीत दोन किलोमीटर रस्त्यावर पायपीट केली. प्रत्येक अतिक्रमणधारकाला बोलावून सायंकाळी पाचपर्यंत अतिक्रमण हटविले नाही तर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकीन. तुम्ही धंदा करता, लोकांचे बळी जात आहेत, लाज वाटत नाही का? अशा शब्दांत आयुक्तांनी प्रत्येकाला फैलावर घेत आपला रुद्रावतार दाखविला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत; तर दुपारनंतर बायपासच्या सर्व्हिस रोडचे काम सुरू करूनच त्यांनी काढता पाय घेतला. 

बीड बायपासवर सातत्याने अपघात होत असून, शुक्रवारी (ता. आठ) व रविवारी (ता. दहा) झालेल्या अपघातांत दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे सोमवारी सकाळी 10.30 वाजेपासून नागरिकांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आयुक्त थेट रस्त्यावर उतरले. एमआयटी चौकापासून त्यांनी सर्व्हिस रस्त्याची पाहणी सुरू केली. प्रशांत अवसरमल, प्रदीप बुरांडे, सायली जमादार यांच्यासह इतरांनी महापालिकेने सर्व्हिस रस्त्यासाठी मार्किंग केले आहे; मात्र इमारत मालकच ही जागा वापरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्तांनी प्रत्येक दुकानदाराला बोलावून घेत रस्ता कुठून आहे? तुम्ही कोठून वापरता, असा प्रश्‍न केला. त्यावर अनेकांनी स्वतःच सांगितले, आम्ही दुकाने मागे घेतो. मात्र आयुक्त संतप्त होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत रोडवरचे सामान काढून घ्या; अन्यथा पाचला मीच जेसीबी घेऊन येतो. तुमच्या साहित्यावरून रोलरच फिरवतो, अशी तंबी त्यांनी दिली. रोज रस्त्यावर बळी जातात, तुम्ही रस्ते गिळून त्यावर धंदा करीत आहात? लाज वाटत नाही का? अशा शब्दांत त्यांनी प्रत्येकाला फैलावर घेतले. यावेळी पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त ज्ञानोबा मुंडे, सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल आडे, वाहतूक शाखेचे अशोक मुदीराज यांची उपस्थिती होती. 
 
...नहीं तो कब्र खोद दुँगा 
 अनेकांनी पोलिस आयुक्तांचा रौद्रावतार पहिल्यांदाच अनुभवला. हॉटेल, टपऱ्या, रसवंत्या, फळांची दुकाने, शोरूम, बॅंका, मंगल कार्यालयांनी सर्व्हिस रोडची जागा हडप केली आहे. त्या प्रत्येकाला "पोलिस को पहचाने नही... अतिक्रमण नही निकाला तो, यहींपे तेरे साईज का गड्डा खोद के गाड दूँगा...' अशी भाषा आयुक्तांनी वापरली. 
 
महापालिकेची नाही गरज, आता पोलिसच! 
 बस्स झाले आता, महापालिकेची कारवाईसाठी गरज नाही. जे करतील ते पोलिसच, असे आयुक्तांनी नमूद केले. त्यानंतर मात्र महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला पाचारण करून त्यांनी या पथकामार्फत कारवाई सुरू केली. 
 
कारमध्ये घेतली सही 
खासगी जेसीबी मागवून इथे आताच पाडापाडी करा, अशा सूचना पोलिस अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या. त्यानंतर मात्र त्यांनी महापालिकेमार्फत बंदोबस्तासाठी अर्ज घ्या, नंतरच कारवाई सुरू करा, अशा सूचना केल्या. आपल्या कारमध्ये बसून, त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांची सही घेतली. 
 
फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्यास बघून घेईन... 
संतप्त आयुक्त एमआयटी चौक ते अयप्पा मंदिर चौकापर्यंत पायी फिरून प्रत्येकाला तंबी देत होते. यावेळी काहींनी त्यांच्या पाहणीची व्हिडिओ शूटिंग केली, तर छायाचित्रकारांनी फोटो काढले. त्यावर "नो फोटो, नो व्हिडिओ' अगर किसने मेरा फोटो या व्हिडिओ व्हायरल किया तो देख लूँगा, असा दमही त्यांनी भरला. 
 
दिवसभरात दोन किलोमीटरचा रस्ता मोकळा 
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख उपअभियंता ए. बी. देशमुख, पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, काकडे, नगररचनाचे उपअभियंता चामले यांच्या पथकाने दोन जेसीबींच्या माध्यमातून सायंकाळपर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता मोकळा केला. 
 
विनायक हिवाळेंना आवाहन 
पोलिस आयुक्तांनी छोट्या-मोठ्यांना इशारा दिला; मात्र विनायक हिवाळे यांचे प्रकरण न्यायालयात असल्याची कल्पना पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना दिली होती. त्यामुळे तुमचे काय म्हणणे आहे, वकिलांच्या सल्ल्याने सायंकाळपर्यंत सांगा, तुम्ही मदत केली तर लोक तुमचे नाव घेतील, असे सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com