पाककलेतून तरुण अभियंत्याने साधली आर्थिक प्रगती, आईवडीलही लावतात हातभार

रत्नाकर नळेगावकर
Saturday, 10 October 2020

अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील तरुण अभियंत्याने स्वत:च्या पाककलेचा वापर व्यवसायात केला असून टाळेबंदी काळात हॉटेल चालू करून आर्थिक प्रगती साधली आहे.

अहमदपूर (जि.लातूर) : अहमदपूर तालुक्यातील परचंडा येथील तरुण अभियंत्याने स्वत:च्या पाककलेचा वापर व्यवसायात केला असून टाळेबंदी काळात हॉटेल चालू करून आर्थिक प्रगती साधली आहे. परचंडा येथील सदानंद रंगनाथ बोईनवाड या तरुणाने बारावीपर्यंतचे शिक्षण अहमदपूर येथे घेऊन पुढील शिक्षणसाठी पुणे येथे गेला. आई शांता बोईनवाड व वडील रंगनाथ बोईनवाडसह दोन बहिणी असे पाच सदस्यीय सदानंदचे कुटुंब.

तीन हजार लोकसंख्येची तहान भागते फक्त हातपंपांवर, पाणीपुरवठा योजना कोसो दूर

आई वडिलांनी काम करून विकत घेतलेल्या दोन एकर शेतातील भाजीपाला विक्रीच्या उत्पन्नावर दोन मुली व एका मुलाचे शिक्षण व स्वतःच्या घरखर्चाचे नियोजन केले. एक बहीण कला शाखेत पदव्युत्तर, दुसऱ्या बहिणीने औषधनिर्माण शास्त्राची पदवी, तर सदानंद याने कलर व पेंटींग या विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्याने तीन वर्षांपासून कंपनीत काम करणे चालू केले, परंतु टाळेबंदीत घरून काम करण्याची पद्धत आली व त्याने कंपनीतील  कामाचे स्वरूप बदलून त्याच ठिकाणी कन्सल्टींगचे काम चालू केले. यातून त्यास महिना वीस हजार रूपये मिळतात.

अंगावर वीज पडून दोघी मायलेकी जखमी, जालना जिल्ह्यातील घटना

या कामातून बराच वेळ शिल्लक राहत होता. त्याने या वेळेचा सदुपयोग घेण्याचे ठरवले. घराची परिस्थिती बेताची असल्याने शैक्षणिक काळात पैशाची चणचण भागविण्यासाठी सदानंद केटरर्सचे काम करीत असे. या वेळी त्याचे स्वयंपाक्याशी संबंध यायचे. यातूनच त्याने वडापाव, पावभाजी, पोहे, चहा असे खाण्याचे पदार्थ बनवणे शिकले. या खाद्यपदार्थ बनवण्याच्या कलेचा फायदा टाळेबंदीतील रिकाम्या वेळी घेण्यासाठी त्याने हॉटेल व्यवसाय सुरू केला. अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावरील परचंडा पाटी येथे आईच्या बचत गटातून दोन लाख कर्ज घेऊन सहा महिन्यांपासून हॉटेल व्यवसाय सुरू केला असून कोणत्याही कामासाठी कामगार ठेवला नाही. त्याच्या कामात आई व वडील मदत करतात. या व्यवसायातून त्यांना सर्व खर्च जाऊन महिना तीस ते पस्तीस हजार रूपये निव्वळ नफा होतो.  
 

 

मी कलर व पेन्टींग शाखेत अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. घरातील आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शैक्षणिक काळात मी केटरर्सचे काम करीत होतो. याच काळात स्वयंपाक्याशी जवळीकता आल्याने विविध खाद्यपदार्थ बनवणे शिकलो. या कलेचा फायदा टाळेबंदी काळात चालू केलेल्या हॉटेल व्यवसायात मिळाला.
- सदानंद बोईनवाड, परचंडा

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Engineer Make Money Through Cooking Latur News